गोव्यात विदेशी मद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता

आखाती देशांतील युद्धाचा परिणाम : विक्रेत्यांसह हॉटेल, पर्यटन उद्योगाला बसणार फटका

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th May, 10:05 pm
गोव्यात विदेशी मद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता

पणजी : आखाती देशांतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे गोव्यात विदेशी बनावटीच्या मद्याच्या दरात लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे. वाहतूक खर्चात झालेली वाढ आणि रुपयाचे अवमूल्यन यामुळे ही दरवाढ होणार असून, याचा थेट फटका मद्य विक्रेते तसेच हॉटेल आणि पर्यटन उद्योगाला बसणार आहे. गोव्यात व्हिस्की, वोडका, टकीला आणि ब्रँडी यांना मोठी मागणी असली तरी आखाती देशांतील संघर्षामुळे वाहतूक व शिपिंग खर्च वाढल्याने विदेशी मद्याच्या किमती वाढणार आहेत.

आखाती देशांतील युद्धाचा गोव्याच्या मद्य बाजारपेठेवर थेट परिणाम

मेक्सिकोमध्ये तयार होणारी टकीला तसेच अमेरिका व युरोपमध्ये तयार होणाऱ्या व्हिस्कीच्या दरात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन झाल्याने वाढ होणार आहे, असे गोवा मद्य विक्रेते संघटनेचे अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक यांनी सांगितले. स्कॉटलंडमध्ये तयार होणाऱ्या स्कॉच व्हिस्कीच्या दरात पौंडाच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घटल्याने वाढ होणार आहे. तसेच, युरोपमध्ये तयार होणाऱ्या वोडका आणि वाईनचे प्रमुख ब्रँड युरोचा दर वाढल्याने महाग होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

रुपयाचे अवमूल्यन आणि वाढता शिपिंग खर्च मद्यप्रेमींच्या खिशाला बसणार

सध्या स्कॉच व्हिस्की, टकीला तसेच इतर ब्रँडचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने तत्काळ दरवाढ होणार नसली तरी नवीन साठा आल्यावर वाढीव शिपिंग खर्च लागू होणार असल्याने दर वाढणार आहेत. विदेशी चलनाच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन तसेच शिपिंग खर्च वाढल्यामुळे आणि मद्य साठवण्यासाठी लागणाऱ्या बाटल्या व कॅनचा कच्चा माल विदेशातून येत असल्याने त्यांच्या किमतीतही वाढ झाली आहे. या जागतिक घडामोडींमुळे स्थानिक वितरकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

नवा साठा आल्यावर विदेशी मद्याच्या किमतीत होणार मोठी वाढ

स्कॉच व्हिस्की आणि टकीला यांसारख्या ब्रँडला गोव्यात मोठी मागणी असल्याने दरवाढीचा परिणाम विक्रीवर होऊन विक्रेत्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढल्यामुळे हॉटेल उद्योगावर आधीच परिणाम झाला असून, पंचतारांकित तसेच मोठ्या हॉटेलांमध्ये देशी-विदेशी पर्यटकांकडून पसंती मिळणाऱ्या स्कॉच व्हिस्की, टकीला आणि वोडकाच्या दरवाढीमुळे पर्यटन उद्योगालाही काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे, असे टीटीएजीचे अध्यक्ष जॅक सुखिजा यांनी सांगितले.

हॉटेल आणि पर्यटन उद्योगासमोर महागाईचे दुहेरी संकट

#GoaLiquorPrice #GoaTourism #ImportedLiquor #ScotchWhisky #EconomyNews #GoaNews #MarathiNews #BreakingNewsGoa
हेही वाचा