म्हापसा पालिकेला मिलाग्रीस फेस्त फेरीतून १५.२६ लाखांचा महसूल

दहा दिवसांची होती फेरी : कारवाईतून काहींना वगळल्याने फेरीवाल्यांत नाराजी


1 hours ago
म्हापसा पालिकेला मिलाग्रीस फेस्त फेरीतून १५.२६ लाखांचा महसूल

म्हापसा येथील मिलाग्रीस फेस्ताच्या फेरीतील स्टॉल्सवाल्यांकडून सोपो वसूल करताना पालिका कर्मचारी.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : येथील मिलाग्रीस सायबीण फेस्ताच्या फेरीतून म्हापसा पालिकेने १५.२६ लाखांचा सोपो वसूल केला आहे. यामध्ये १३.९५ लाख रूपये कर रक्कम, तर १.३१ लाख रुपये दंडाच्या रकमेचा समावेश आहे. सेंट जेरॉम चर्चतर्फे साजरा होणार्‍या वार्षिक मिलाग्रीस फेस्ताच्या फेरीमध्ये अंदाजे २०० स्टॉल्स थाटले जातात. चर्च ते अलंकार थिएटर दरम्यान कपडे व खेळणी, तर चर्च ते कोमुनिदाद घर इमारत दरम्यान फर्निचर व दगडी वस्तू स्टॉल्सचा सहभाग होता. दोन्ही बाजूच्या रस्त्यांच्या कडेला फेरीतील दुकाने थाटली जातात.
यंदा २० एप्रिल रोजी फेस्त साजरे झाले. पालिकेने फेरीसाठी २९ एप्रिलपर्यंत म्हणजेच दहा दिवसांची मुदत दिली होती. सोपोच्या स्वरूपात पालिकेने स्टॉल्स व लहान विक्रेत्यांकडून १३ लाख ९५ हजार ५० रुपयांची रक्कम वसूल केली. दंडाच्या स्वरूपात १ लाख ३१ हजार २०० रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली. गेल्यार्षी १५ दिवसांपेक्षा जास्त दिवस ही फेरी होती. त्यावेळी १७.१७ लाख रुपयांचा महसूल सोपोतून मिळाला होता. फेस्ताच्या फेरीतील सोपो वसुलीसाठी पालिका अधिकार्‍यांनी पालिका निरीक्षक नरसिंह राटवळ, वरिष्ठ कारकून नीलेश लिंगुडकर, कर्मचारी चिन्नाप्पा होळेप्पन्वर, प्रकाश कांबळे व आप्पालाल तासिवाले यांची नियुक्ती केली होती.
पालिका अधिकाऱ्यांकडून सापत्नभावाची वागणूक
फेरीतील चर्च ते अलंकार थिएटर दरम्यानचे स्टॉल्स ३० एप्रिलपर्यंत हटवण्यात आले नसल्याने सदर फेरीवाल्यांकडून प्रत्येकी ५०० ते २ हजार रुपये याप्रमाणे ८१ हजार २०० रुपये पालिकेने दंडस्वरूपात वसूल केला. फर्निचर स्टॉल्सवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली नाही. काही निवडक फर्निचरवाल्यांच्या वस्तू जप्त करण्यात आल्या. नंतर ५० हजार रुपये दंड आकारून जप्त केलेल्या वस्तू परत करण्यात आल्या. त्यामुळे फेरीतील स्टॉल्सबाबत पालिका अधिकार्‍यांनी दिलेल्या सापत्नभावाच्या वागणुकीवरून फेरीवाल्यांनी नाराजी व्यक्त केली.
मिलाग्रीस फेस्ताच्या फेरीतून सोपोच्या माध्यमातून पालिकेला सुमारे १५.२६ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. पालिकेच्या नियुक्त सोपो वसुली पथकाने चोख कामगिरी बजावत हा महसूल मिळवला आहे.
- प्रकाश भिवशेट, प्रभारी नगराध्यक्ष, म्हापसा      

हेही वाचा