मुख्यमंत्री : वास्कोत भुयारी रस्त्याचे लोकार्पण

भुयारी रस्त्याचे लोकार्पण करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत खासदार सदानंद शेट तानावडे, मंत्री रमेश तवडकर, मंत्री मॉविन गुदिन्हो, आमदार क़ृष्णा साळकर, आमदार संकल्प आमोणकर, नगराध्यक्ष गिरीश बोरकर, रेल्वे व्यवस्थापक बेला मीना व इतर.
..
प्रतिनिधी। गोवन वार्ता
वास्को : वास्कोच्या विकासासाठी केंद्र सरकारने १८० कोटी रुपये दिले आहेत. यामुळे वास्कोचा कायापालट होण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. येथील तानिया हॉटेलसमोरच्या भुयारी रस्त्याचे बुधवारी त्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. तसेच बहुउद्देशीय क्रीडा संकुलाची व पालिका व्यावसायिक संकुलाची पायाभरणी करण्यात आली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
या कार्यक्रमाला क्रीडा व युवा व्यवहार मंत्री डॉ. रमेश तवडकर, पंचायत मंत्री मॉविन गुदिन्हो, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, मुरगावचे नगराध्यक्ष गिरीश बोरकर, क्रीडा व युवा व्यवहार खात्याचे संचालक डॉ. अजय गावडे, दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुवळी विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक बेला मीना, तसेच नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते. सुमारे चार मीटर उंची असलेल्या या भुयारी मार्गामुळे रुग्णवाहिका, अग्शिशमन दलाची मोठी वाहने, इतर आपत्कालीन वाहने सहजपणे जाऊ शकतील. यामुळे १२ किलोमीटरचा वळसा घालून जाणे टळणार आहे. याप्रसंगी मंत्री तवडकर, मंत्री गुदिन्हो, आमदार साळकर, आमदार आमोणकर व इतरांचीही भाषणे झाली.
वास्कोमध्ये येणार आणखी प्रकल्प
भुयारी रस्त्याच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, भुयारी रस्त्यामुळे शहरी वाहतूक सुधारण्याच्या व लोकांसाठी अधिक जलद व सुरक्षित कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्याच्या दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हा प्रकल्प आधुनिक पायाभूत सुविधा सार्वजनिक सोयीसुविधांप्रती असलेली सरकारची वचनबद्धता दर्शवित आहे. भविष्यात वास्कोमध्ये आणखी प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत.