लष्करी आस्थापनांना लक्ष्य केल्याने खळबळ : ‘हाय अलर्ट’ जारी

चंदीगड : पंजाबमध्ये मंगळवारी रात्री काही तासांच्या अंतराने झालेल्या दोन वेगवेगळ्या स्फोटांमुळे राज्याची सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. पहिला स्फोट जालंधरमधील सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) मुख्यालयाबाहेर, तर दुसरा अमृतसरमधील खासा लष्करी छावणी परिसरात झाला. या दोन्ही घटनांमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, लष्करी भागांना लक्ष्य करण्यात आल्याने संपूर्ण पंजाबमध्ये ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास जालंधर-दिल्ली महामार्गावर असलेल्या बीएसएफच्या पंजाब फ्रंटियर मुख्यालयाबाहेर उभी असलेली एक स्कूटर अचानक पेटली आणि तिचा भीषण स्फोट झाला. सुरुवातीला हा अपघात वाटत असला तरी, सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हा प्रकार गंभीर असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी २२ वर्षीय कुरिअर बॉय गुरप्रीत सिंग याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे.
जालंधरच्या घटनेनंतर अवघ्या दोन तासांत, रात्री १०.५० च्या सुमारास अमृतसरमधील खासा लष्करी छावणीच्या परिसरात दुसरा स्फोट झाला. अमृतसर (ग्रामीण) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने छावणीच्या भिंतीच्या दिशेने संशयास्पद वस्तू फेकली आणि त्यानंतर जोरदार स्फोट झाला. या आवाजामुळे परिसरात मोठी घबराट पसरली होती.
सुरक्षा व्यवस्थेत वाढ
या घटनांमागे कोणत्याही दहशतवादी संघटनेचा हात आहे का किंवा ही सीमापार षडयंत्राची कृती आहे का, या दिशेने पंजाब पोलिसांनी उच्चस्तरीय तपास सुरू केला आहे. सर्व लष्करी तळ, छावण्या आणि संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा अधिक कडक करण्यात आली असून, नाकाबंदी करून संशयितांची तपासणी केली जात आहे.
‘आयईडी’ वापराचा संशय
पोलीस आयुक्त धनप्रीत कौर आणि वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली. सुरुवातीला ही अपघाती आग असल्याचा कयास लावला जात होता, मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात दोन्ही ठिकाणी 'इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस' वापरण्यात आल्याचा दाट संशय आहे. फॉरेन्सिक टीम, बॉम्ब शोधक आणि श्वान पथकाने घटनास्थळावरून नमुने गोळा केले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.