तामिळनाडूत सत्ता स्थापनेसाठी चुरस; अभिनेता विजयच्या टीव्हीकेचा सरकार स्थापनेसाठी दावा

बहुमत सिद्ध करण्यासाठी दोन आठवड्यांची मागितली मुदत

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
15 mins ago
तामिळनाडूत सत्ता स्थापनेसाठी चुरस; अभिनेता विजयच्या टीव्हीकेचा सरकार स्थापनेसाठी दावा

चेन्नई: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत (Tamil Nadu Assembly election)  कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने राज्यात सत्ता स्थापनेची चुरस रंगली आहे. अभिनेता थलपती विजय यांच्या नेतृत्वाखालील तमिळगा वेट्री कळगम (TVK, टीव्हीके) हा पक्ष २३४ सदस्यीय विधानसभेत १०८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला असून, त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला आहे.

निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर विजय यांनी राज्यपाल (Governor) आर. एन. रवी यांना पत्र पाठवून सरकार स्थापन करण्याची संधी देण्याची विनंती केली आहे. “आम्ही सर्वात मोठा पक्ष आहोत.  त्यामुळे आम्हाला बहुमत सिद्ध करण्याची संधी द्यावी,” असे त्यांनी नमूद केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, टीव्हीकेने बहुमत सिद्ध करण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी मागितला आहे.

दरम्यान, कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने राज्यपाल कायदेशीर तज्ज्ञांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्याची शक्यता आहे. २३ एप्रिल रोजी झालेल्या निवडणुकीनंतर ही स्थिती निर्माण झाली आहे.

विजय यांनी पेरंबूर आणि तिरुचिरापल्ली ईस्ट या दोन्ही मतदारसंघांतून विजय मिळवला असून, ते पेरंबूरची जागा कायम ठेवण्याची शक्यता आहे.

राजकीय विश्लेषक सुमंथ रमण यांच्या मते, “राज्यपाल विजय यांना सरकार स्थापन करण्यासाठी बोलावू शकतात आणि नंतर विश्वासदर्शक ठरावाद्वारे बहुमत सिद्ध करण्यास सांगू शकतात. विरोधी पक्ष तत्काळ सरकार पाडण्याचा धोका पत्करणार नाहीत, त्यामुळे अल्पमतातील सरकारही चालू शकते.”

दरम्यान, काँग्रेस (Congres Party)  नेते राहुल गांधी यांनी विजय यांचे अभिनंदन करत टीव्हीकेच्या यशाला “युवकांच्या वाढत्या आवाजाचे प्रतीक” असे संबोधले आहे. काँग्रेसचे तामिळनाडू प्रभारी गिरीश चोडणकर यांनी निकाल अनपेक्षित असल्याचे सांगत, “राज्यात बदलाची लाट होती आणि युवक व महिलांनी मोठ्या प्रमाणात टीव्हीकेला पाठिंबा दिला,” असे मत व्यक्त केले.

सध्या राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून, पुढील काही दिवसांत राज्यपालांचा निर्णय आणि विधानसभा पटलावरील बहुमत चाचणी याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


हेही वाचा