अटलांटिक महासागरातील 'लक्झरी क्रूझ'वर हंताव्हायरसामुळे ३ पर्यटकांचा मृत्यू

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
3 hours ago
अटलांटिक महासागरातील 'लक्झरी क्रूझ'वर हंताव्हायरसामुळे ३ पर्यटकांचा मृत्यू

केप वर्दे : अटलांटिक महासागरातून प्रवास करणाऱ्या 'एमव्ही हॉन्डियस' (MV Hondius) या आलिशान क्रूझ शिपवर जीवघेण्या 'हंताव्हायरस'चा (Hantavirus) उद्रेक झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने  दिलेल्या माहितीनुसार, या संसर्गामुळे आतापर्यंत तीन पर्यटकांचा मृत्यू झाला असून सात रुग्ण आढळले आहेत. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली असून जहाज सध्या आफ्रिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर केप वर्देजवळ अडकून पडले आहे.

नेमकी घटना काय?

हे जहाज मार्च महिन्यात अर्जेंटिना येथून अंटार्क्टिक मोहिमेसाठी निघाले होते. प्रवासादरम्यान पर्यटकांना संसर्ग झाला. मृतांमध्ये नेदरलँड्समधील एका जोडप्याचा आणि एका जर्मन नागरिकाचा समावेश आहे. पहिली मृत्यूची घटना ११ एप्रिल रोजी घडली, तर त्यानंतर मृताच्या पत्नीचा आणि अन्य एका प्रवाशाचा मृत्यू झाला. सध्या एक ब्रिटीश नागरिक दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे.

British crew member in urgent care amid suspected hantavirus outbreak on cruise ship

बचावकार्य आणि वैद्यकीय खबरदारी

जहाजावर सध्या १५० लोक (८८ प्रवासी आणि ५९ कर्मचारी) असून त्यात प्रामुख्याने ब्रिटिश, अमेरिकन आणि स्पॅनिश नागरिकांचा समावेश आहे. संसर्ग पसरण्याच्या भीतीने 'केप वर्दे' प्रशासनाने जहाजाला किनार्यावर येण्यास मनाई केली आहे. दोन गंभीर आजारी कर्मचारी आणि एका संपर्कातील व्यक्तीला उपचारांसाठी नेदरलँड्सला हलवण्याची तयारी सुरू आहे. त्यानंतर हे जहाज पुढील वैद्यकीय तपासणीसाठी स्पेनच्या 'कॅनरी आयलंड'कडे रवाना होईल.

The MV Hondius cruise ship is anchored at a port in Praia, Cape Verde on May 4, 2026.

हंताव्हायरसचा धोका किती?

'डब्लूएचओ' च्या मते, हा विषाणू प्रामुख्याने उंदीर आणि तत्सम प्राण्यांच्या विष्ठा, मूत्र किंवा लाळेतून पसरतो. मानवाकडून मानवाकडे होणारा प्रसार दुर्मिळ असला तरी, या जहाजावर 'अँडीज व्हायरस' (Andes virus) असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, जो मानवी संपर्कातून पसरू शकतो. विशेष म्हणजे, जहाजावर उंदीर नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे, त्यामुळे पर्यटकांना दक्षिण अमेरिकेतच संसर्ग झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.

विमान प्रवाशांचा शोध सुरू

मृत नेदरलँड्सच्या महिलेने आजारी असताना सेंट हेलेना येथून जोहान्सबर्गला विमानाने प्रवास केला होता. त्या विमानात ८२ प्रवासी आणि ६ कर्मचारी होते. खबरदारीचा उपाय म्हणून दक्षिण आफ्रिका प्रशासन या सर्व प्रवाशांचा शोध घेत असून त्यांना आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

The priority is to evacuate two crew members who require urgent care. (AFP)Cruise ship MV Hondius docks off Cape Verde port, as passengers were not allowed off the ship, while health authorities investigated suspected cases of hantavirus aboard the vessel, in Praia Port, Cape Verde on May 4, 2026. (Picture taken with a mobile phone)

सध्या जहाजावरील वातावरण शांत असून कंपनी प्रवाशांना सुरक्षितपणे मायदेशी पाठवण्यासाठी आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्थांशी समन्वय साधत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, सामान्य जनतेला यापासून असलेला धोका सध्या कमी आहे.

हेही वाचा