म्हणते नैतिक विजय आमचाच; निकालावर कटकारस्थानाचा आरोप

कोलकाता : मावळत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील निकालानंतरही राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. “आमचा पराभव झालेला नाही, आम्ही नैतिकदृष्ट्या जिंकलो आहोत,” असा दावा करत त्यांनी निकालावर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “जर मी हरले असते तर मी स्वतःहून राजीनामा दिला असता. मात्र कोणत्याही दबावाखाली मी पद सोडणार नाही. हा निकाल जबरदस्तीने घडवून आणला गेला असून नैतिक विजय आमचाच आहे.”
खास पत्रकार परिषद घेऊन ममता बॅनर्जी यांनी वरील माहिती दिली.
भाजपचे दोन-तृतीयांश बहुमत
दरम्यान, भारतीय जनता पार्टीने (Bharatiya Janata Party) २०६ जागा जिंकत दोन-तृतीयांश बहुमत मिळवले असून, राज्यातील १५ वर्षांची तृणमूल कॉंग्रेसची (Trinamool Congress (TMC)) सत्ता संपुष्टात आली आहे. हा निकाल राज्याच्या राजकारणातील मोठा बदल मानला जात आहे.
बॅनर्जी यांनी निवडणूक प्रक्रियेवरही आरोप करत भारतीय निवडणूक आयोगावर (Election Commission of India) पक्षपातीपणाचा ठपका ठेवला. “आमची लढत भाजपविरोधात नव्हती, तर निवडणूक आयोगाविरोधात होती. जवळपास १०० जागांवरील जनादेश ‘लुटला’ गेला,” असा आरोप त्यांनी केला.
तसेच मतमोजणी प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा दावा करत, मतमोजणी जाणीवपूर्वक मंदावण्यात आली. जेणेकरून आमच्या कार्यकर्त्यांचे मनोबल खच्चीकरण होईल, असेही त्यांनी नमूद केले. “कालचा दिवस इतिहासात काळा अध्याय म्हणून नोंदवला जाईल,” असेही त्या म्हणाल्या.
ज्ञानेश कुमार यांच्यावरही त्यांनी लोकशाही हक्कांवर गदा आणल्याचा आरोप केला. या संदर्भात पुढील कारवाईबाबत विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराचा आढावा घेण्यासाठी टीएमसीने १० सदस्यीय समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ही समिती प्रभावित भागांना भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा अभ्यास करणार आहे.
“लोकांवर अन्याय आणि छळ झाला तर त्याला भविष्यात तितक्याच ताकदीने उत्तर दिले जाईल,” असा इशाराही बॅनर्जी यांनी दिला.