काँग्रेसचा पाठिंबा : टीव्हीकेला बहुमतासाठी अद्यापही ६ आमदारांची गरज

चेन्नई : तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२६ च्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) या आपल्या नव्या पक्षासह थलपती विजय यांनी ऐतिहासिक कामगिरी करत सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. बुधवारी विजय यांनी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची राजभवन येथे भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा मांडला.
तामिळनाडूच्या २३४ सदस्यीय विधानसभेत बहुमतासाठी ११८ हा आकडा गाठणे आवश्यक आहे. थलपती विजय यांच्या पक्षाने (टीव्हीके) सर्वाधिक १०८ जागा जिंकल्या आहेत. मात्र, विजय यांनी स्वतः दोन जागांवर विजय मिळवल्यामुळे त्यांना एक जागा सोडावी लागणार आहे, परिणामी पक्षाचे संख्याबळ १०७ झाले आहे.
दशकांपासून डीएमकेसोबत असलेली युती तोडून काँग्रेसने थलपती विजय यांना पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेसच्या ५ आमदारांच्या पाठिंब्यामुळे विजय यांच्याकडे सध्या ११२ आमदारांचे संख्याबळ आहे. तरीही बहुमताच्या आकड्यापासून ते ६ जागा दूर आहेत. हा आकडा पूर्ण करण्यासाठी विजय यांनी आता व्हीसीके, सीपीआय आणि सीपीआयएम यांसारख्या छोट्या पक्षांशी चर्चा सुरू केली आहे.
७ मे रोजी शपथविधीची शक्यता
राज्यपालांनी अद्याप टीव्हीकेच्या दाव्यावर अधिकृत शिक्कामोर्तब केलेले नाही, कारण बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेले अधिकृत आकडे अद्याप पूर्ण झालेले नाहीत. मात्र, पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यास थलपती विजय ७ मे रोजी तामिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात.
काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण
तामिळनाडू काँग्रेसचे प्रभारी गिरीश चोडणकर यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, विजय यांना पूर्ण पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. या निर्णयाचे काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून स्वागत केले आहे. विजय यांच्या या यशामुळे तामिळनाडूतील पारंपरिक राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.
........
निवडणुकीतील पक्षनिहाय स्थिती
पक्ष जागा
टीव्हीके : १०८
डीएमके : ५९
एआयएडीएमके : ४७
काँग्रेस : ५
पीएमके : ४
इतर : ११