जुने गोवे येथे कला आणि संस्कृती खात्यातर्फे आयोजित 'सोमनाथ स्वाभिमान पर्व २०२६' चे उद्घाटन

पणजी : सनातन धर्म आणि भारतीय संस्कृती आजच्या 'जनरेशन झी'पर्यंत पोहोचली पाहिजे. यासाठी भाजप सरकार विविध उपक्रम राबवत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. सोमवारी जुने गोवे येथे कला आणि संस्कृती खात्यातर्फे आयोजित 'सोमनाथ स्वाभिमान पर्व २०२६' या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, आमदार राजेश फळदेसाई, खात्याचे संचालक विवेक नाईक आणि स्वामी नरेंद्राचार्य महाराज पिठाचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, भाजपचे सरकार आल्यापासून देशात तसेच राज्यात धार्मिक आणि सांस्कृतिक प्रगती होत आहे. त्याआधीच्या सरकारांनी कधीही हिंदू धर्माचे आणि संस्कृतीचे रक्षण केले नाही. भाजप सरकारनेच राम मंदिर पुन्हा उभारले. राज्यातील भाजप सरकारनेदेखील विविध मंदिरांची उभारणी केली आहे; यामध्ये वेर्णा येथील म्हाळसा नारायणी देवीच्या मंदिराचा समावेश आहे. पूर्वी 'जुने गोवा' म्हटल्यावर पर्यटक केवळ चर्चेसना भेट देत असत, मात्र आता येथील मंदिरे, विशेषतः गोवेश्वर मंदिराला भेट देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या मंदिरात बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन एकाच ठिकाणी करता येते.
ते पुढे म्हणाले की, पोर्तुगीजांनी गोव्यातील सनातन धर्मावर हल्ला केला. लोक एकत्र येऊ नयेत आणि आपल्या धर्माचे पालन करू नये, यासाठी त्यांनी हजारो मंदिरे उद्ध्वस्त केली. आपला देव आणि धर्म वाचवण्यासाठी अनेक गोमंतकीयांना अन्यत्र स्थलांतर करावे लागले. पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांची आठवण म्हणून आम्ही दिवाडी बेटावर कोटी तीर्थ येथे एक मंदिर बांधणार आहोत. याचे काम लवकरच सुरू होणार आहे. सप्तकोटेश्वर मंदिराचे नूतनीकरण करण्याचे कामदेखील आमच्याच कार्यकाळात झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातून सोमनाथ पर्वाची सुरुवात केली असून, यामुळे सनातन धर्माची वृद्धी होण्यास मदत होईल.