अखेर, सुजयच्या कष्टाला फळ आले. एका सुप्रसिद्ध मराठी वाहिनीवरील मालिकेत त्याला 'खलनायकाची' महत्त्वाची भूमिका मिळाली. आपल्या भूमिकेत त्याने जीव ओतला आणि त्याच मेहनतीचे फळ म्हणून आज आई-बाबा अभिमानाने आपल्या मुलाचे कौतुक टीव्हीवर पाहत होते.

आज आई-बाबा दोघेही टीव्हीसमोर खिळून बसले होते. सुजयला 'उत्कृष्ट खलनायक' हा पुरस्कार मिळत असल्याचे पाहून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता; त्यांची छाती अभिमानाने फुलून आली होती.
सुजय हा त्यांचा एकुलता एक मुलगा. लहानपणापासूनच तो अतिशय आज्ञाधारक होता. आई-बाबा सांगतील ती 'पूर्व दिशा', असा त्याचा परिपाठ होता. सुजयला मनापासून नाटकाची आणि अभिनयाची आवड होती, परंतु घरून त्याला कधीच पाठिंबा मिळाला नाही. कधी कधी तर तो घरी न सांगताच शाळेतील नाटकात सहभागी व्हायचा. दहावीत उत्तम गुण मिळाल्यावर, केवळ पालकांच्या आग्रहाखातर त्याने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. त्याची आई एका नामांकित शाळेत हिंदी शिक्षिका होती, तर वडील 'बँक ऑफ इंडिया'मध्ये व्यवस्थापक (मॅनेजर) होते. घरात आर्थिक सुबत्ता भरपूर होती, पण सुजयला मात्र स्वतःचे स्वातंत्र्य नव्हते.
बाबांच्या कडक शिस्तीमुळे आणि आईच्या धाकामुळे सुजयला स्वतःचे मन मोकळे करण्याची कधी हिंमतच झाली नाही. त्याला सतत वाटायचे की, त्याच्या आवडीचे क्षेत्र हिरावून घेऊन त्याचे प्राणच जणू कोणीतरी काढून घेत आहे. नववीत असताना आई-बाबांचा स्पष्ट नकार असूनही त्याने त्यांना न सांगता एका नाटकात सहभाग घेतला. नाटकाच्या तालीम आणि प्रयोगामुळे त्या दिवशी त्याला घरी पोहोचायला उशीर झाला. तेव्हा बाबा त्याच्यावर प्रचंड ओरडले आणि म्हणाले, “तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? अभिनय करून काहीच फायदा नाही, त्या केवळ वेळ वाया घालवण्याच्या गोष्टी आहेत. आम्ही ठरवलंय तुला इंजिनिअर करायचंय आणि तेच तू करणार! यापुढे खबरदार जर अभिनयाकडे वळलास तर...”
त्या दिवशी तो अगदीच हिरमुसून गेला. खरंतर त्याच्या अभिनयाची खूप स्तुती झाली होती, पण घरी आल्यावर मात्र आई-बाबांकडून असे शब्द त्याच्या कानी पडत होते. तो खूप रडला. 'माझ्याच बरोबर हे असं का? माझे आईबाबा हे असं का वागतायत?' असे स्वतःलाच विचारत त्याने एक निश्चय केला—मी इंजिनिअरिंगची पदवी नक्की घेईन, पण माझे करिअर अभिनय क्षेत्रातच करणार आणि तिथे खूप मोठा होऊन दाखवणार! त्या दिवशी आई-बाबांना जाणीव होईल की ते चुकले होते आणि ते अभिमानाने माझे कौतुक करतील. इतर पालकांनाही यातून धडा मिळेल की, मुलांच्या स्वप्नांना साथ देणे किती महत्त्वाचे असते.
अखेर बारावीत असताना त्याने आईला स्पष्ट शब्दांत सांगितले, "आई, तुला वाटतेय ना मी इंजिनिअर व्हावे? मी तुमच्या समाधानासाठी इंजिनिअरिंगची पदवी मिळवून तुमच्या हातात देईन, पण त्यानंतर मात्र मी माझ्या आवडीचेच क्षेत्र निवडणार. हे तुला मान्य आहे का?" सुजयचे हे बाणेदार रूप पाहून आई थक्क झाली आणि तिने गोंधळलेल्या मनःस्थितीतच त्याला 'हो' म्हटले.
पुढील चार वर्षे सुजयने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास मन लावून केला, पण कॉलेजमधील अभिनयाची एकही संधी त्याने सोडली नाही. पदवी मिळाल्यावर दिलेला शब्द पाळत त्याने ती पदवी पालकांच्या स्वाधीन केली आणि आपले स्वप्न गाठण्यासाठी तो मुंबईला रवाना झाला. मुंबईतील सुरुवातीचे दिवस खूप संघर्षाचे होते. कधी वडापाव खाऊन दिवस काढले, तर कधी एकामागून एक ऑडिशन्स देऊनही पदरी निराशा आली.
याच काळात त्याची ओळख सायलीशी झाली. सायली स्वतः इंजिनिअर होती आणि एका आयटी कंपनीत नोकरी करत होती. तिने सुजयचा संघर्ष जवळून पाहिला होता. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले. जेव्हा जेव्हा सुजय खचून जायचा, तेव्हा सायली त्याला खंबीर पाठिंबा द्यायची.
अखेर, सुजयच्या कष्टाला फळ आले. एका सुप्रसिद्ध मराठी वाहिनीवरील मालिकेत त्याला 'खलनायकाची' महत्त्वाची भूमिका मिळाली. आपल्या भूमिकेत त्याने जीव ओतला आणि त्याच मेहनतीचे फळ म्हणून आज आई-बाबा अभिमानाने आपल्या मुलाचे कौतुक टीव्हीवर पाहत होते.
तात्पर्य: पालकांनी मुलांच्या आवडीनिवडीचा नेहमी विचार करायला हवा. आवड नसताना एखाद्या क्षेत्रात जबरदस्तीने पाठवले, तर मुले तिथे मनाने कधीच रमत नाहीत. करिअर ही केवळ एक-दोन वर्षांची गोष्ट नसून ते संपूर्ण आयुष्याचे भांडवल असते. सुजय समंजस होता म्हणून त्याने मार्ग काढला, परंतु प्रत्येक मुलाला आपल्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा हक्क असायला हवा, तरच त्यांचे भविष्य खऱ्या अर्थाने उजळेल...

- सौ गौरी रोशन वेर्लेकर