सायकल सिंकिंग: शरीराच्या नैसर्गिक लयीत जगण्याचा नवा दृष्टिकोन..

सायकल सिंकिंग ही संकल्पना उपयुक्त असली तरी, ती प्रत्येकासाठी सारखीच काम करेल असं नाही. काही महिलांमध्ये चक्र अनियमित असू शकतं किंवा हार्मोनल औषधं चालू असू शकतात.

Story: आरोग्य |
11 mins ago
सायकल सिंकिंग:  शरीराच्या नैसर्गिक लयीत जगण्याचा नवा दृष्टिकोन..

सकाळी ऑफिसची मीटिंग, दुपारी क्लायंट कॉल, संध्याकाळी मुलासोबत वेळ. रियाचं आयुष्य सतत धावपळीत चाललेलं होतं. ती स्वतःला नेहमी ‘स्ट्रॉंग’ समजायची. “काहीही झालं तरी मला थांबायचं नाही,” हा तिचा नियमच होता. पण मधेच काही दिवस असे यायचे, जेव्हा तीच रिया अचानक थकून जायची. छोट्या गोष्टींवर चिडचिड व्हायची, कामात लक्ष लागत नसे आणि स्वतःवरच राग यायचा. “मी एवढी बदलत का आहे.. की मी स्वतःलाच ओळखत नाहीये?” हा प्रश्न तिला सतावत राहायचा. पण हळूहळू तिला जाणवलं, कदाचित समस्या तिच्यात नव्हतीच.. ती फक्त दर वेळेस तिच्या शरीरातून येणाऱ्या आवाजाकडे दुर्लक्ष करत होती.

सायकल सिंकिंग म्हणजे काय?

सायकल सिंकिंग म्हणजे आपल्या मासिक पाळीच्या चक्रानुसार आहार, व्यायाम आणि दैनंदिन दिनचर्या जुळवून घेण्याची पद्धत. महिलांच्या शरीरात दर महिन्याला इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्समध्ये बदल होत असतात, आणि त्याचा परिणाम ऊर्जा, मूड, झोप आणि कार्यक्षमतेवर दिसून येतो.

आजच्या धावपळीच्या जीवनात महिलांकडून दररोज एकसारखी कार्यक्षमता अपेक्षित असते. पण वास्तवात, शरीराची ऊर्जा दररोज सारखी नसते. म्हणूनच दररोज एकसारखं काम करण्याऐवजी, शरीराच्या लयीनुसार जगणं अधिक नैसर्गिक आणि आरोग्यदायी ठरू शकतं.

मासिक चक्राचे चार टप्पे आणि त्यानुसार व्यायामाचं आयोजन कसं करावं?

1. मेंस्ट्रुअल फेज (पाळीचा काळ)

या काळात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन दोन्ही हार्मोन्स कमी असतात. त्यामुळे थकवा, अंगदुखी किंवा ऊर्जा कमी वाटू शकते. लोखंडयुक्त आहार (पालक, खजूर, डाळी) घ्यावा आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे स्वतःला थोडा वेळ द्यावा.

 योग्य व्यायाम : हलके स्ट्रेचिंग, वॉकिंग, ब्रीदिंग एक्सरसाइज, सौम्य योगासने, पेल्विक मोबीलीटी व्यायाम

 टाळावेत : अतितीव्र कार्डिओ, जड वजन उचलणे, शरीराला फार दमवणारे हाय इंटेंसिटी इंटरव्हल ट्रेनिंग.

या दिवसांत शरीराला “पुश” करण्यापेक्षा “सपोर्ट” करण्याची गरज असते.

2. फोलीक्युलार फेज (नवीन ऊर्जा)

पाळीनंतर या टप्प्यात इस्ट्रोजेन वाढू लागते आणि शरीरात ऊर्जा, उत्साह वाढू लागते. मन अधिक सक्रिय होते. नवीन कामांची सुरुवात, योजना होऊ शकते. नवीन कौशल्य शिकण्यासाठी ही योग्य वेळ असते.

 योग्य व्यायाम : स्ट्रेंथ ट्रेनिंग, कोर स्ट्रेंथनिंग, पीलाटेस, सायकलिंग, जोगींग, नवीन फिटनेस रूटिन सुरू करणे.

या काळात शरीर व्यायामाला चांगला प्रतिसाद देते.

3. ओव्युलेशन  फेज (उच्च कार्यक्षमता)

या टप्प्यात आत्मविश्वास, ऊर्जा आणि संवाद कौशल्य सर्वोच्च असतं. काम करण्यासाठी उर्जा असते. सामाजिक संवादासाठी साठी उत्तम वेळ असतो.

 योग्य व्यायाम : कार्डिओ, हाय-इंटेन्सिटी वर्कआउट, ट्रेकिंग/ हायकींग, धावणे, हेवी स्ट्रेंथ ट्रेनिंग, मैदानी खेळ.

साहसी उपक्रम, प्रवास किंवा शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक कामे या काळात अधिक सहज वाटू शकतात.

4. ल्युटीयल फेज (शांततेकडे वाटचाल)

या टप्प्यात प्रोजेस्टेरॉन वाढल्यामुळे शरीर थोडं जड, ब्लोटेड किंवा लवकर थकलेलं वाटू शकतं. थकवा, चिडचिड (पीएमएस) जाणवू शकतो.

 योग्य व्यायाम : मध्यम गतीचे चालणे, सौम्य स्ट्रेंथ ट्रेनिंग, योग, सांधे आणि स्नायूंची नैसर्गिक हालचाल क्षमता वाढवणारे व्यायाम, पोहणे, विश्रांती-केंद्रित तणाव कमी करणारे व्यायाम. 

या काळात शरीरावर जास्त ताण दिल्यास चिडचिड आणि थकवा वाढू शकतो. त्यामुळे व्यायामाची तीव्रता कमी ठेवणे फायदेशीर ठरते.

सायकल सिंकिंगचे प्रमुख फायदे:

१. शरीरातील ऊर्जेचे संतुलन

टप्प्यानुसार व्यायाम: जेव्हा शरीरात ऊर्जा जास्त असते (उदा. फॉलिक्युलर किंवा ओव्हुलेशन फेज), तेव्हा तीव्र व्यायाम केला जाऊ शकतो. जेव्हा ऊर्जा कमी असते (उदा. मासिक पाळीचा सुरुवातीचा काळ), तेव्हा हलके व्यायाम केल्याने थकवा येत नाही आणि शरीराची ऊर्जा टिकून राहते.

२. संप्रेरकांचे संतुलन

हार्मोनल चढ-उतारांनुसार आहाराची निवड केल्याने (उदा. ल्युटल फेजमध्ये मॅग्नेशियमयुक्त अन्न), मासिक पाळीच्या दरम्यान होणारे हार्मोनल असंतुलन कमी होण्यास मदत होते.

३. पीएमएस लक्षणांमध्ये कपात

सायकल सिंकिंगमुळे मासिक पाळीपूर्वी होणारी चिडचिड, मूड स्विंग्स, ओटीपोटात दुखणे आणि सूज येणे/ ब्लोटिंग सारख्या समस्या कमी होतात.

४. वजन व्यवस्थापन 

हार्मोनल चक्राला अनुसरून चयापचय बदलते. सायकल सिंकिंगनुसार आहार घेतल्यास वजन नियंत्रणात ठेवणे सोपे जाते. 

५. मानसिक आरोग्य आणि उत्तम मूड 

मासिक पाळीच्या चक्राशी सुसंगत राहिल्याने तणाव कमी होतो आणि मानसिक आरोग्य सुधारते.

६. उत्तम पचन आणि शरीराला आवश्यक पोषण:

प्रत्येक टप्प्यावर शरीराला वेगवेगळ्या पोषक तत्त्वांची गरज असते. त्यानुसार आहार घेतल्यास पचनक्रिया सुधारते.

मासिक पाळीचे टप्पे लक्षात न घेता आपण शरीराला रोज एकसारखं काम करायला भाग पाडतो, पण शरीर प्रत्येक दिवशी वेगळं काही सांगत असतं हे आपण ऐकत नाही. पण, सायकल सिंकिंग प्रक्रिया समजून घेतल्याने महिलांना त्यांच्या शरीराच्या नैसर्गिक बदलांची जाणीव होते आणि न लढता, त्या बदलांशी जुळवून घेतल्याने शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहू शकते.

एक मात्र लक्षात असावे की, सायकल सिंकिंग ही संकल्पना उपयुक्त असली तरी, ती प्रत्येकासाठी सारखीच काम करेल असं नाही. काही महिलांमध्ये चक्र अनियमित असू शकतं किंवा हार्मोनल औषधं चालू असू शकतात. म्हणूनच हा “कठोर नियम” नसून- स्वतःच्या शरीराला समजून घेण्याची प्रक्रिया आहे. कारण आपल्या शरीराच्या या लयीशी जुळवून घेतलं, तर जीवन अधिक संतुलित, निर्मितीक्षम आणि आनंदी होऊ शकतं.

- डॉ. श्वेता राऊत मुळगावकर