जेव्हा तुम्ही घरात पारदर्शकता ठेवता, तेव्हा भविष्यातील अनेक संभाव्य धोके टळू शकता; कारण शेवटी तुमची सुरक्षा हीच तुमच्या पालकांची सर्वात मोठी प्राथमिकता असते.

आपण वर्तमानपत्रामध्ये वाचतो किंवा मोबाईलवर पाहतो की, एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला. हे ऐकून आपल्याला खूप वाईट वाटते आणि रागही येतो. जर आपल्याला हे इतके वाईट वाटत असेल, तर जिच्यासोबत हे घडले आहे, तिच्या मनावर याचा काय परिणाम झाला असेल? लैंगिक अत्याचार का होत असतील? हे सर्व आपल्या मुलीसोबत होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो?
आताच्या आधुनिक युगामध्ये दोन्ही पालक नोकरी करतात, त्यामुळे आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला त्यांना पुरेसा वेळ मिळत नाही. अनेकदा घरातील एखाद्या जबाबदार व्यक्तीकडे किंवा घरकाम करणाऱ्या व्यक्तीकडे मुलांना सोपवले जाते. मुलांच्या हाती फोन दिला जातो. पालकांनी ही काळजी घेतली पाहिजे की, आपल्या मुलांच्या फोनवर व्हॉट्सअॅप (WhatsApp) शिवाय इतर कोणतेही सोशल मीडिया अॅप नसावे.
वयाच्या बाराव्या वर्षानंतर मुलींकडे लक्ष देण्याची खूप गरज असते. आपल्या मुलीला कोणत्याही व्यक्तीने जाळ्यात ओढू नये, याची दक्षता घेतली पाहिजे. आपल्या मुलांना ट्यूशनला किंवा मित्र-मैत्रिणींच्या घरी सोडताना त्यांच्या देखरेखीची काळजी घेतली पाहिजे. मुलींना जाळ्यात ओढण्याचे काम या मोबाईलमुळे सोपे झाले आहे. आईने आपल्या मुलींना 'लैंगिक अत्याचार' आणि 'बलात्कार' म्हणजे काय, हे समजावून सांगितले पाहिजे; तसेच मुलांमध्येही याबद्दल जागरूकता निर्माण केली पाहिजे. आपण कोठेही असू, अनोळखी व्यक्तीशी बोलू नये. जर एखाद्या अनोळखी माणसाने तुमच्याशी बोलण्याचा किंवा खुणा करण्याचा प्रयत्न केला, तर याची कल्पना सोबत असलेल्या किंवा घरातील मोठ्या माणसांना त्वरित द्यावी.
पालकांनी आठवड्यातून एकदा तरी आपल्या मुलांसोबत वेळ घालवावा. त्यांना काही त्रास तर होत नाही ना, याची खात्री करावी. समजा, तुम्हाला कळाले की तुमची मुलगी कोणाच्या तरी जाळ्यात फसली आहे, तर त्या माणसाला अद्दल घडवण्यासाठी एकही क्षण थांबता कामा नये. आपण आपल्या मुलींना फुलांसारखे जपतो, त्यांना एखाद्या राजकुमारीप्रमाणे ठेवतो. अत्याचार करणारा माणूस अत्याचार का करत असेल? त्याची बुद्धी इतकी भ्रष्ट का होत असेल? शेवटी हे सर्व पालकांनी दिलेल्या संस्कारांवर अवलंबून असते.
लैंगिक अत्याचार नेहमी अल्पवयीन मुलींवरच होतात असे नाही; काही वेळा हे वयात आलेल्या किंवा विवाहित स्त्रियांच्या बाबतीतही घडू शकतात. कधी कधी पीडित महिला घाबरते आणि कोणालाच काही सांगत नाही. काही वेळा अत्याचार करणारी व्यक्ती घरातीलच असू शकते. घरचे लोक आपल्यालाच जबाबदार धरतील, या भीतीने ती तोंड उघडत नाही. तिच्या मनात आत्महत्येसारखे टोकाचे विचार येतात. काही वेळा लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले जाते आणि ऐन वेळी नकार दिला जातो.
मुलींनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीबद्दल किंवा प्रेमसंबंधांविषयी आपल्या आईला विश्वासात घेऊन नक्की सांगावे. पालकांपासून कोणतीही गोष्ट लपवून किंवा चोरून-लपून फिरायला जाण्यापेक्षा, त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधणे कधीही सुरक्षित ठरते. जेव्हा तुम्ही घरात पारदर्शकता ठेवता, तेव्हा भविष्यातील अनेक संभाव्य धोके टळू शकतात; कारण शेवटी तुमची सुरक्षा हीच तुमच्या पालकांची सर्वात मोठी प्राथमिकता असते. माझे यावर एवढेच मत आहे की, असे काही तुमच्यासोबत घडत असेल, तर याची माहिती आपल्या आई-वडिलांना किंवा घरातील विश्वासू व्यक्तीला द्या. गप्प बसू नका. वेळ जाण्यापूर्वी योग्य निर्णय घ्या. चुकीच्या माणसाला जवळ येऊ देऊ नका.
- निकिता कांदोळकर
कांदोळी, बार्देश - गोवा