कपाट आवरणं ही साधी घरगुती कृती नसते. ती एक भावनिक प्रक्रिया असते. थोडी अस्ताव्यस्त. थोडी nostalgic. आणि कधी कधी नकळत डोळे ओले करून जाणारी.

तर आजचा आपला विषय आहे घर आवरण्याचा... हा प्रकार प्रत्येक भारतीय माणसाच्या आयुष्यातला एक अत्यंत गुंतागुंतीचा भावनिक अनुभव आहे. विशेषतः कपाट आवरणं.
“उद्या नक्की आवरते” असं म्हणत म्हणत कपाटाचं दार उघडलं की आतून कपडे, गोष्टी अंसं भरपूर काही धबधब्यासारखं बदबदा बाहेर पडतात आणि आपल्याकडे असा कटाक्ष टाकतात, जणू म्हणतायत, “आम्हालाही माहितीय, तू परत आम्हाला आत कोंबून दार बंद करून जाणार आहेस.”
आता तुम्ही विचाराल, अगं पण मानसी, मानसोपचार आणि कपाटातील पसारा ह्याचं काय कनेक्शन?
अहो, कपाट आवरणं ही प्रत्यक्षात घरकामापेक्षा negotiation जास्त असते.
“हे ठेवायचं का?”
“अगं पण कधीतरी उपयोगी पडेल!”
“पण गेली सात वर्षं वापरलं नाहीस!”
आणि गंमत म्हणजे, कपाट आवरायचा कंटाळा आपल्याला फक्त आळशीपणामुळे येत नाही. त्यामागे एक खोल मानसशास्त्र दडलंय. कारण कपाट आवरणं म्हणजे फक्त कपड्यांच्या घड्या करणं नसतं. त्यामुळे आज त्याच कपाट आवरण्याच्या साध्यासुध्या वाटणाऱ्या गोष्टीकडे एका वेगळ्या, थोड्या psychoanalytical नजरेतून पाहूया.
तुम्ही कधी घरातल्या त्या ओव्हर फ्लो होणाऱ्या कपाटाकडे पाहिलंत का? आपण जेव्हा हे कपाट उघडतो तेव्हा प्रत्यक्षात ते कपाट उघडत नसतो तर आपण स्वतःचाच एखादा जुना काळ उघडत असतो, नाही का? त्या घड्या घातलेल्या साड्यांमध्ये एखादं लग्न दडलेलं असतं. एका जुन्या टी-शर्टमध्ये कॉलेजचं बेफिकीर हसू अडकलेलं असतं. एखाद्या छोट्याशा डब्यात आता अस्तित्वातही नसलेल्या नात्यांचा गंध बंदिस्त असतो.
आणि म्हणूनच कपाट आवरणं ही साधी घरगुती कृती नसते. ती एक भावनिक प्रक्रिया असते. थोडी अस्ताव्यस्त. थोडी nostalgic. आणि कधी कधी नकळत डोळे ओले करून जाणारी.
एक गोष्ट मला नेहमी जाणवते की माणूस त्याच्या बोलण्यापेक्षा ‘साठवून ठेवण्याच्या सवयी’तून जास्त दिसतो. काही लोक वस्तू साठवतात, काही दुःखं. काही आठवणी. काही न बोललेले संवाद. म्हणून मला तरी माणसाचं मन आणि कपाट यांच्यात एक विलक्षण साम्य दिसतं, दोन्ही ठिकाणी आपण गरजेपेक्षा जास्त जुनेपण जपून ठेवलेलं असतं.
कपाटातली प्रत्येक वस्तू ही केवळ वस्तू नसते. ती एखाद्या काळाची एक ईमोशनल बुकमार्क असते. उदा. ती कॉलेजची ओढणी जी आता ना अंगाला बसते ना काळाला. पण ती फेकणं म्हणजे आपल्या जुन्या स्वतःलाच निरोप देण्यासारखं वाटतं. एखादी परफ्यूमची रिकामी बाटली ज्यातला सुगंध संपलेला असतो, पण आठवणींचा वास अजूनही रेंगाळत असतो.
किंवा एखादं ग्रीटिंग कार्ड ज्या व्यक्तीशी आता संवादही उरलेला नसतो, पण त्या कागदातला भावनिक स्पर्श अजून हातातून सुटत नाही. आम्ही मानसशास्त्रात याला emotional attachment किंवा object attachment म्हणतात. काही वस्तूंमध्ये आपण नकळत स्वतःचाच एखादा भाग गुंतवून ठेवलेला असतो. त्या वस्तू म्हणजे आपल्या भावनांचे प्रतिनिधी बनतात. म्हणूनच काही लोकांना वस्तू फेकणं म्हणजे आठवणींना धोका दिल्यासारखं वाटतं.
भारतीय घरात तर clutter हा एक स्वतंत्र कुटुंब सदस्य असतो. “कधीतरी उपयोगी पडतील” म्हणून ठेवलेले कपडे, आणि पाच वर्षांपासून हरवलेल्या चार्जरची वायर हे सगळं आपल्या collective anxiety चं प्रतीक आहे.
कारण आपल्या पिढीला वस्तूंची किंमत शिकवली गेली पण भावना सोडून देण्याची कला शिकवली गेली नाही. समुपदेशनात अनेकदा लोक म्हणतात, “मला काही गोष्टी सोडता येत नाहीत.” आता गंमत म्हणजे ते नात्यांविषयी बोलत असतात की कपाटाविषयी, हे काही वेळा मलाच समजत नाही.
आपण मनातही असंच clutter साठवत राहतो. कधी जुने राग. अपूर्ण संवाद. न बोललेलं दुःख. एखाद्याने सहज बोललेलं टोचणारं वाक्य. गिल्ट. अपेक्षा. निराशा. सगळं आपण मनाच्या एखाद्या कप्प्यात ढकलून ठेवतो. वरून सगळं व्यवस्थित दिसत राहतं. पण आत इतका पसारा साचलेला असतो, की नवीन आनंदालासुद्धा जागा उरत नाही.
फ्राॅईड म्हणतो तसं, दडपलेल्या भावना कधीच पूर्णपणे नाहीशा होत नाहीत. त्या फक्त रूप बदलतात. कधी चिडचिड बनतात. कधी anxiety. कधी थकवा. आणि कधी एका छोट्याशा कपाट आवरण्याच्या प्रसंगात अचानक डोळ्यात येणारं पाणी.
म्हणूनच काही लोक कपाट आवरताना अचानक शांत होतात. ज्याला आपण decluttering असं म्हणतो. हे फक्त वस्तू कमी करणं नव्हे. तो स्वतःला विचारायचा एक प्रामाणिक प्रश्न असतो की “ही गोष्ट अजून माझ्या आयुष्यात प्रेमाने आहे का, की फक्त सवयीने अडकून बसली आहे?”
आणि वस्तूंना विचारता विचारता कधी आपण तोच प्रश्न नात्यांनाही विचारू लागतो हे लक्षात ही येत नाही. कारण धूळ फक्त वस्तूंवर बसते असं नाही. काही धूळ आठवणींवर, भावनांवर आणि मनावरही साचलेली असते. आणि अधूनमधून ती हलक्या हाताने साफ करणं हीसुद्धा एक प्रकारची मानसिक स्वच्छताच असते.

- मानसी कोपरे
मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक
डिचोली - गोवा
७८२१९३४८९४