सुमन जेव्हा जेव्हा ती साडी हातात घेते, तेव्हा तिला फक्त एक साडी आठवत नाही; आठवतं ते आईचं प्रेम, त्या काळातील साधेपणा आणि दारात येणाऱ्या साडीवाल्याच्या हाकेने घराघरांत होणारे आनंदी वातावरण.

“साड्या पाहा हो साड्या... नवी डिझाईन... पुणेरी, पैठणी, छापाच्या साड्या...!”
दुपारच्या शांत वेळी गल्लीमध्ये घुमणारी ती हाक ऐकली की घरातल्या बायकांच्या कानात जणू एखादी गोड घंटाच वाजायची. आजच्या मॉल आणि ऑनलाइन खरेदीच्या काळात हे दृश्य थोडं विरळ झालं असलं, तरी एक काळ असा होता की घरपोच साड्या घेऊन येणारे विक्रेते म्हणजे स्त्रियांसाठी मोठा आनंदाचा सोहळा असायचा. त्या आठवणींमध्येच कायमची जपून ठेवलेली आहे सुमनच्या आयुष्यातील ‘पहिली वहिली’ साडी.
सुमन तेव्हा नुकतीच कॉलेजमध्ये जाणारी, स्वप्नाळू मुलगी होती. घरातलं वातावरण एकदम साधं. वडिलांची सरकारी नोकरी, तर आई काटकसर करून संसार करणारी. प्रत्येक गोष्टीचं मोल शिकवत सुमनच्या आई-वडिलांनी तिला व तिच्या भावाला वाढवलं. त्यामुळे त्यांची हौसमौज मर्यादेतच असायची. दिवाळीला एक नवीन ड्रेस किंवा वाढदिवसाला एखादी आवडती वस्तू मिळाली तरी खूप आनंद व्हायचा.
त्याकाळी त्यांच्या वाडीत दर महिन्याला एक साडीवाला यायचा. उंच बांधा, डोक्यावर मोठ्ठं गाठोडं, गल्लोगल्ली फिरती असल्यामुळे कपाळावर घाम, पण चेहऱ्यावर कायम हसू. “वहिनी, आज नवीन माल आणलाय...” म्हणत तो घराघरांत फिरायचा. त्याच्या येण्याची चाहूल लागली की वाड्यातल्या काकू, मावश्या, वहिनी एकमेकींना आवाज द्यायच्या. कुणी चहा ठेवायचं, कुणी पंखा आणायचं. मग अंगणात चटई टाकून साड्यांचं गाठोडं चटईवर सोडलं जायचं... जणू काही एखादं प्रदर्शनच भरावं तसं.
त्या दिवशीही असंच झालं होतं. आईने साडीवाल्याला घरात बसवलं. रंगीबेरंगी साड्यांचा ढीग समोर होता आणि सुमनचे डोळे चमकले. गुलाबी, जांभळी, हिरवी, मोरपंखी... प्रत्येक साडी जणू काही वेगळी गोष्ट सांगत होती. साडीवाल्याच्या हाताची सफाई इतकी सुंदर होती की एका झटक्यात साडी उघडायची आणि दुसऱ्या झटक्यात पुन्हा नीट घडी व्हायची.
“ताई, ही बघा... कॉलेजला जाणाऱ्या मुलींना भारी शोभते,” असं म्हणत त्याने एक आकाशी निळ्या रंगाची साडी पुढे केली.
सुमनचं मन त्या साडीवर एका क्षणात जडलं. नाजूक पांढऱ्या फुलांची छपाई, वजनाला हलकंसं कापड आणि त्याला साजेसा पातळ चंदेरी काठ. तिने अलगद हात फिरवला आणि क्षणभर स्वतःला आरशात त्या साडीत पाहिलं. तिच्या मनात नकळत एक वेगळंच भावविश्व उभं राहिलं. कॉलेजचा स्नेहसंमेलन दिवस, मैत्रिणींच्या कौतुकाच्या नजरा, आईच्या चेहऱ्यावरचा अभिमान...
पण पुढच्याच क्षणी वास्तव समोर आलं.
“काय भाव आहे रे?” आईने विचारलं.
“फक्त दोनशे पंचाहत्तर, वहिनी. एकदम टिकाऊ माल.”
आईच्या कपाळावर आठ्या उमटल्या. त्या महिन्यात घरात आधीच खर्च जास्त झाला होता. वडिलांच्या औषधांचा खर्च, धाकट्या भावाची फी... आईने साडी पुन्हा घडी करत बाजूला ठेवली.
सुमन काही बोलली नाही, पण तिचा चेहरा उतरला हे आईच्या नजरेतून सुटलं नाही. गरीब नव्हते ते, पण प्रत्येक गोष्ट विचार करून घ्यावी लागायची. सुमनने स्वतःलाच समजावलं, “असू दे... पुढच्या वेळी घेऊ.”
साडीवाला निघून गेला. घरातील कामं आवरायला हवीत असं म्हणत जो तो आपापल्या घरी गेला. पण सुमनच्या मनात ती निळी साडी मात्र सतत डोकावत राहिली. त्या रात्री झोपताना देखील तिला तीच आठवत होती.
दोन दिवसांनी आईने तिला जवळ बोलावलं.
“सुमन, उद्या तुझ्या कॉलेजमध्ये कार्यक्रम आहे ना?”
“हो आई...”
आईने कपाटातून एक पिशवी बाहेर काढली. सुमनने उघडून पाहिलं आणि तिचे डोळे विस्फारले. तीच ती आकाशी निळी साडी!
“आई... ही?”
“त्या साडीवाल्याला मी दुसऱ्या दिवशी भेटले. थोडे पैसे कमी केले त्याने, मग घेतली तुझ्यासाठी.”
सुमनच्या डोळ्यांत पाणी आलं. त्या साडीची किंमत फक्त दोनशे पंचाहत्तर रुपये नव्हती; त्यामागे आईचं प्रेम, तिची काटकसर आणि मुलीच्या छोट्याशा इच्छेची केलेली जपणूक होती.
दुसऱ्या दिवशी पहिल्यांदाच साडी नेसताना सुमन कितीतरी वेळ ती साडी हातात घेऊन बसली होती. मग आईने सुमनला साडी नेसवली, पदर नीट केला. निऱ्या सारख्या राहत नव्हत्या, त्या पिन लावून व्यवस्थित केल्या. केसात जाईचा गजरा माळला आणि कपाळावर छोटी टिकली लावली, तेव्हा आईने हसून म्हटलं, “माझी मुलगी मोठी झाली गं आता!”
कॉलेजमध्ये त्या दिवशी सगळ्यांनी तिचं खूप कौतुक केलं. पण सुमनसाठी सगळ्यात खास क्षण होता घरी परतल्यावर आईने केलेलं कौतुक.
आज या गोष्टीला अनेक वर्षे झाली. सुमनच्या कपाटात महागड्या साड्या आहेत; पैठण्या आहेत, सिल्क आहेत, डिझायनर साड्याही आहेत. पण त्या सगळ्यांमध्ये एका जुन्या कापडी पिशवीत अजूनही जपून ठेवलेली आहे ती आकाशी निळी साडी. काळानुसार तिचा रंग थोडा फिका झाला आहे, कापडही जुनं झालं आहे, पण तिच्याशी जोडलेल्या आठवणी आजही ताज्याच आहेत.
आजच्या पिढीला कदाचित घरात येऊन साड्या विकणाऱ्या त्या विक्रेत्यांचं महत्त्व कळणार नाही. त्यांच्या गाठोड्यात फक्त साड्या नसत, तर त्यात असायच्या अनेक घरांतील छोट्या छोट्या स्वप्नांच्या घड्या. एखाद्या नववधूची पहिली साडी, एखाद्या मुलीचा कॉलेजमधला पहिला कार्यक्रम, एखाद्या आईची दिवाळीची खरेदी... सगळ्या भावना त्या रंगीबेरंगी कापडांत गुंफलेल्या असायच्या.
सुमन जेव्हा जेव्हा ती साडी हातात घेते, तेव्हा तिला फक्त एक साडी आठवत नाही; आठवतं ते आईचं प्रेम, त्या काळातील साधेपणा आणि दारात येणाऱ्या साडीवाल्याच्या हाकेने घराघरांत होणारे आनंदी वातावरण.
खरंच, काही वस्तूंची किंमत पैशांत मोजता येत नाही. त्या जपल्या जातात आठवणींमध्ये... अगदी सुमनच्या त्या पहिल्या वहिल्या साडीप्रमाणे.
