पहिली भेट... शहराच्या गोंधळात हरवलेली ओळख

​आज त्यांची पहिली भेट होते. दोन वेगवेगळ्या व्यक्तींची, जणू दोन टोकांवर राहणाऱ्या जगांची. एक जग मोकळ्या आभाळाखाली निसर्गाच्या सान्निध्यात वाढलेले आणि दुसरे काँक्रीटच्या जंगलात वाढलेले.

Story: पहिलं वहीलं |
10th April, 09:30 pm
पहिली भेट... शहराच्या गोंधळात हरवलेली ओळख

ती आज पहिल्यांदाच शहरात जायला निघाली आहे. वडगावसारख्या खेडेगावच्या मोकळ्या वातावरणात लहानाची मोठी झालेली ती. निसर्गाच्या कुशीत दरवळणारा मातीचा वास, सरळ साधे आयुष्य, पशु-पक्षी, प्राणी यांच्यासोबत जगणारी ती आज एका गजबजलेल्या शहरात पाऊल ठेवणार आहे. याआधी ती तालुक्याला जायची; कधी परीक्षा आहे म्हणून, तर कधी आजारपणामुळे डॉक्टरकडे. पण तेव्हाही सोबतीला घरातील कुणीतरी असायचेच.

​आज मात्र ती एकटीच शहरात जायला निघाली. फोनवर बोलणे झालेले असल्याने आणि मुलगी चांगली शिकलेली आहे, ती कुठे हरवणार नाही, असा विश्वास वाटल्याने घरच्यांनी तिला पाठवले. असे असले तरी तिच्या मनात उत्सुकता आहे, थोडी भीती आहे आणि खूप सारे प्रश्नही.

​तो तिला कालच फोनवर सांगतो, "बसने ये. राजापूर बसस्थानकावर उतर. मी तिथेच थांबलेलो असेन. मग आपण सोबत घरी जाऊ. आई-बाबांशी बोलणे होईल."

​ती "हो" म्हणते, पण तिच्या मनात 'राजापूर बसस्थानक' या शब्दाचे नेमके चित्र स्पष्ट नसते. तिच्यासाठी गावातील चौकात एसटी थांबते तेच बसस्थानकाचे चित्र होते. पण शहरातील बसस्थानक किती मोठे असेल, किती गजबजलेले असेल, याची तिला कल्पना नसते.

​बस शहरात शिरते तशी तिची नजर खिडकीबाहेर जाते. उंच इमारती, धावणाऱ्या गाड्या, सिग्नल, हॉर्नचा कर्कश आवाज... सगळेच नवीन, सगळेच अनोळखी. ती चुडीदारची ओढणी नीट करते, वाऱ्यामुळे विस्कटलेले केस मागे सारते आणि मनातल्या मनात घाबरलेली ती स्वतःला सावरते.

​बस थांबते. "सगळ्या प्रवाशांनी उतरा. शेवटचा स्टॉप. राजापूर बसस्थानक," कंडक्टर मोठ्याने सांगतो.

​ती घाबरतच खाली उतरते. आजूबाजूला माणसांची प्रचंड गर्दी. कोणी धावतेय, कोणी फोनवर बोलतेय, कोणी कुठे जायचे म्हणून विचारतेय. तिच्या गावाकडची शांतता तिला इथे कुठेच दिसत नाही. ती थोडी गोंधळलेली असते आणि एका बाजूला उभी राहते.

​'त्याला फोन करावा का? पण फोनवर शहरातील भाषेत मला नीट बोलता येईल का? इथे कुणाला काय विचारणार?' तिच्या तोंडातून नकळत गावाकडच्या बोलीतील शब्द बाहेर पडतात. तिला वाटते, 'अरे, हे असे बोलणे ऐकून तो काय म्हणेल?'

​इतक्यात तिचा फोन वाजतो. "कुठे आलीस?" तो विचारतो.

​ती हलक्या आवाजात म्हणते, "मी... हा... बस उतरली... इथेच उभी हाय... मोठं ठिकाण हाय... लोकं खूप हायत..." ती काही खुणा सांगते.

​त्याला तिचा संकोच जाणवतो. तो हसत म्हणतो, "ठीक आहे, तू कुठे जाऊ नकोस. तिथेच थांब. मी येतो तिकडे."

​ती तिथेच उभी राहते आणि येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाकडे तो दिसतो का, म्हणून बघत राहते. एवढ्यात गर्दीतून तो समोर येताना दिसतो. शहरातील साधा पण नीटनेटका पोशाख, आत्मविश्वासाने चालणारा असा तो तिच्यासमोर येऊन थांबतो. क्षणभर दोघेही काही बोलत नाहीत. ती त्याच्याकडे पाहते. हा तोच आहे... फोनवर हसत-खेळत बोलणारा. पण आज तो प्रत्यक्षात तिच्यासमोर उभा आहे.

​तो हलक्या आवाजात विचारतो, "खूप वाट पाहावी लागली का?"

​ती लगेच मान हलवते आणि म्हणते, "नाय... आत्ताच आले..."

​तिच्या गावाकडच्या भाषेतील बोलण्याची ढब त्याला गोड वाटते. तो गालातल्या गालात हसतो, ती थोडी लाजते. तिला वाटते, 'हा का हसतोय? मी नीट बोलतेय ना? माझी भाषा त्याला विचित्र तर वाटत नसेल ना?'

​तो तिच्या मनातले ओळखतो. तो सहजपणे म्हणतो, "चल, आधी आपण चहा प्यायला जाऊ. तिथे मग शांतपणे बोलू."

​त्या एका वाक्याने तिचा सगळा ताण नाहीसा होतो. ती दोघेही बसस्थानकाच्या गोंधळातून बाजूला असलेल्या एका हॉटेलमध्ये चहा प्यायला जातात. ती चालताना आजूबाजूला बघतच राहते. तो सोबत असूनही शहर तिला अजूनही नवखेच वाटते. तो तिच्या चालण्याकडे लक्ष देतो. थोडी संकोचलेली, पण प्रामाणिक; कसलाही दिखावा नाही.

​ती त्याच्या चालण्याकडे पाहते, आत्मविश्वास, शहरातील वातावरणात वावरण्याची सवय, वेग आणि तरीही तिच्यासाठी थांबणारी पावले.

​आज त्यांची पहिली भेट होते. दोन वेगवेगळ्या व्यक्तींची, जणू दोन टोकांवर राहणाऱ्या जगांची. एक जग मोकळ्या आभाळाखाली निसर्गाच्या सान्निध्यात वाढलेले आणि दुसरे काँक्रीटच्या जंगलात वाढलेले. पण त्या दोघांमध्ये संवादाचा एक पूल तयार होतो. समजुतीचा, हास्याचा आणि न बोलता जाणवणाऱ्या आपलेपणाचा.

​ती अजूनही थोडी अडखळत बोलते, तो मुद्दाम हळू आणि सोप्या भाषेत उत्तर देतो. आणि शहराच्या त्या गोंधळात त्यांची पहिली भेट हळूहळू आकार घेत राहते. साधी आणि निरागस...


- मंजिरी वाटवे