बालपण आठवणींचा एक जिवंत ठेवा

पन्नाशी उलटली आमची, पण उत्साह अजून दांडगा आहे. आता खुणावतंय ते अंगण, तो पत्त्यांचा जोड, तो भावाला घर साफ करताना मिळालेला लगोरी सेट... आणि आम्ही वाट पाहतोय ती कधी एकत्र भेटायची याची! आणि हो, तोच एक मोठा प्रॉब्लेम आहे...

Story: सहज सुचलेलं |
03rd April, 10:13 pm
बालपण आठवणींचा एक जिवंत ठेवा

दा​​​भाळीत माझे बालपण गेले. वरच्या वाड्यावर आमचे घर होते. आमच्या समवयस्क मैत्रिणींचा एक ग्रुप होता. खेळायला, फिरायला आम्ही नेहमी एकत्र असायचो. तसे रुसवे फुगवे असायचेच आणि ते नसतील तर मग मैत्रिणी कसल्या? पण लगेचच समेट व्हायचा आणि सगळं गावच्या नदीच्या वाहत्या पाण्यात विरून जायचं.

​मोठ्या झाल्यावर लग्न, नोकरीच्या निमित्ताने आम्ही पांगलो. प्रत्येक जण आपल्या संसारात मग्न झाला. आपण म्हणतो ना की काळ हे सर्व गोष्टींवर एक चांगले औषध आहे; ते योग्यच आहे, पण माझ्या मते हा काळ नाती धूसर करतो. कित्येकदा जुन्या नात्यांचा काही संबंधच राहत नाही. असो!

​तर झाले काय, परवा अशाच एका जुन्या मैत्रिणीचा फोन आला. दुपारची वेळ होती, काम ना धाम! सहज एक तास गेला, पण खरं सांगू तो कसा गेला कळलेच नाही. अख्खा 'वरचा वाडा' डोळ्यांसमोर जिवंत झाला. आमच्या गावात तीन वाडे, त्यातील वरच्या वाड्यावर सात ते आठ घरे होती. वेगवेगळ्या जातींची कुटुंबे होती, पण आम्हाला काय त्याचे? एक मस्त ग्रुप जमला होता आमचा. माझे आणि अजून एकीचे घर जरा ऐसपैस होते, त्यामुळे आमचा 'अड्डा' बऱ्याचदा तेथेच असे. अर्थात, अभ्यास कमी आणि खेळच जास्त! आणि सुट्टी असेल तर कोणाची बिशाद आम्हाला अभ्यास करायला लावायची?

​पूर्वी फेस्तात रंगीत कपडे घातलेल्या प्लास्टिकच्या बाहुल्या मिळायच्या. आम्ही सर्वजणी आईच्या जुन्या साड्या नेसून बाहुल्यांशी खेळायचो. त्यांना अंघोळ काय घालायचो, पावडर काय लावादचो, केस विंचारायचो! कित्येकदा हे सगळं करताना त्या बाहुल्या मोडायच्या, पण त्या आमच्या लाडक्या होत्या. खरं सांगू, मनात 'आईपण' रुजायचं ते या खेळामुळेच.

​आमची शाळा घरापासून तशी लांब होती. मधल्या सुट्टीत भरपूर वेळ असायचा. आम्ही पुडीचा पांढरा दोरा पेन्सिलला गुंडाळून शाळेत न्यायचो, चतुर पकडायला! चतुर हा एक कीटक असतो, लांब शेपटी असलेला. आम्ही त्याच्या शेपटीला दोरा बांधायचो आणि सोडून द्यायचो. ज्याचा चतुर उंच उडेल तो जिंकला. एक दिवस टीचरने हा प्रकार पाहिला; मग पडलेल्या मारानंतर हा प्रकार कायमचा बंद झाला. तेव्हा अक्कल कुठे होती हो? लहान होतो आम्ही. शाळेतून रमतगमत आल्यावर पाटावरच्या थंडगार पाण्यात अंघोळ करणे नित्याचेच होते. पाटाच्या बाजूने पायवाट होती, तिथून जाणाऱ्यांच्या अंगावर पाणी उडवणे हा आमचा उद्योग! शिव्या पडायच्या, पण तो सुद्धा खेळाचाच एक भाग समजा.

​साधारण एप्रिल महिन्यात बाबा अंगणात मांडव घालीत. एक भारी मनोरंजक खेळ होता, जो जुन्या लोकांना आठवत असेल, 'मेडियानी' खेळ. आम्ही सगळ्या, विशेषतः माझी बहीण रूपा या खेळात एक्स्पर्ट होतो. मांडवाला टेकू म्हणून 'माड्या' असायच्या, त्या धरून धावायचे. मजा यायची आणि भूकही खूप लागायची. पण जरा पाय चुकला तर पडायची भीती, मग ढोपर फुटलेच समजा!

​लगोरी हा असाच एक प्रिय खेळ. माझ्या आजीने सावंतवाडीहून लाकडी लगोरीचा सेट आणला होता. मध्ये दांडा आणि गोलाकार लगोऱ्या! वेळ कसा जायचा कळायचेच नाही. हे सगळे बालपणातील खेळ होते. अनाडीपण होते, अजाण होतो आम्ही. संध्याकाळी आमच्या अंगणात नुसता कल्ला उसळायचा. आरडाओरडा, भांडणे व्हायची पण खूप मजा यायची. विशेषतः लगोरी खेळताना बॉल मारला की आमचा कुत्रा 'टायगर' तो तोंडात घेऊन धावत सुटायचा. त्याला समजावताना नाकी नऊ यायचे.

​असे करता करता आम्ही मोठे झालो आणि जरा जाणतेही. आपोआप खेळाचे स्वरूप बदलत गेले. सुरू झाले 'बॅडमिंटन' (थोडक्यात फुल बॅट). संध्याकाळी कॉलेजमधून आले की बॅडमिंटनच्या स्पर्धा भरत. अर्धा अर्धा तासाचे गेम खेळायचे. उन्हाळ्यात आत्या यायची, मग रोज रात्री मस्त 'मेंढीकोट' रंगायचा. आम्हा बहिणींची एक सांकेतिक भाषा होती, त्यामुळे नेहमी 'कोट' आम्हीच द्यायचो. लाडीस, गड्डा, झब्बू, पाच तीन दोन... किती खेळ पत्त्यांचे! बाबा सावर्ड्याहून खास पत्त्यांचे जोड आणायचे.

​खरं सांगू, खूप मजा आणि धमाल केली लहानपणी. प्रत्येक दिवस जणू एक वेगळी आठवण होती. त्याच आठवणींचा उजाळा त्या फोनवर झाला. बोलताना माझी मैत्रीण पटकन म्हणते कशी, "अगो रेश्मा, आमी परते एक दीस मेळया गो, आणि खेळया मेडियानी!" खरंच जोरदार हसू आले. पन्नाशी उलटली आमची, पण उत्साह अजून दांडगा आहे. आता खुणावतंय ते अंगण, तो पत्त्यांचा जोड, तो भावाला घर साफ करताना मिळालेला लगोरी सेट... आणि आम्ही वाट पाहतोय ती कधी एकत्र भेटायची याची! आणि हो, तोच एक मोठा प्रॉब्लेम आहे...


- रेशम जयंत झारापकर

मडगाव, गोवा.