
उन्हाळा सुरू झाला की नेहमीचे जीन्स, टाइट कपडे किंवा जड फॅब्रिक घालायची अजिबात इच्छा होत नाही. सतत गरम-गरम वाटतं, घाम येतो आणि शरीराला अस्वस्थता जाणवते. अशा हवामानात त्वचेवर लाल चट्टे, घामोळे आणि खाज येण्याच्या समस्या सुरू होतात. त्यामुळे उन्हाळा सुरू झाला की सर्वात मोठा प्रश्न अनेक वर्किंग महिलांसमोर उभा राहतो “फॅशनेबल दिसावं की कम्फर्टेबल राहावं?”
ऑफिसला जाताना नीटनेटके आणि स्टायलिश दिसणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच दिवसभर आरामदायी राहणंही गरजेचं आहे. कारण चुकीच्या कपड्यांमुळे उष्णतेचा त्रास वाढतो, घाम जास्त येतो आणि शरीराची ऊर्जा लवकर कमी होते.
म्हणूनच उन्हाळ्यात योग्य कपड्यांची निवड ही फक्त स्टाईलपुरती मर्यादित नसून, ती तुमच्या आरोग्याशी आणि दैनंदिन कार्यक्षमतेशीही संबंधित आहे.
उन्हाळ्यात कपड्यांची निवड का महत्त्वाची?
उन्हाळ्यात तापमान जास्त असल्यामुळे शरीरातून घाम जास्त प्रमाणात बाहेर पडतो. जर कपडे हवेशीर नसतील तर घाम साचतो, त्वचा चिकट होते आणि अस्वस्थता वाढते. यामुळे थकवा, चिडचिड आणि एकाग्रतेत घट होते. पण योग्य कपडे निवडल्याने शरीर थंड राहते, घाम कमी होतो, त्वचेच्या समस्या टाळता येतात व दिवसभर फ्रेश आणि ऊर्जावान वाटते
कपड्याचे फॅब्रिक निवडताना काय लक्षात ठेवावे?
1. कॉटन : हा सर्वात उत्तम पर्याय असतो. कॉटन कपडे घाम पटकन शोषून घेतात आणि त्वचेला श्वास घेऊ देतात. त्यामुळे ते उन्हाळ्यासाठी सर्वोत्तम मानले जातात.
2. लिनन आणि रेयॉन : हे फॅब्रिक्स हलके आणि हवेशीर असतात. ऑफिस वेअरमध्येही ते सहज वापरता येतात.
3. सिंथेटिक : हे कपडे टाळावे. पॉलिस्टर, नायलॉनसारखे कपडे घाम अडकवतात. यामुळे त्वचेवर रॅशेस आणि इन्फेक्शन होऊ शकते.
रंगांची योग्य निवडही महत्त्वाची!
कपड्यांचा रंगही उष्णतेवर परिणाम करतो.
पांढरा, क्रीम, हलका निळा, पेस्टल रंग हे उष्णता कमी शोषतात
काळा, नेव्ही ब्लू, गडद रंग उष्णता जास्त शोषतात
त्यामुळे उन्हाळ्यात शक्यतो हलक्या रंगांचे कपडे वापरणे फायदेशीर ठरते.
कम्फर्टला प्राधान्य द्या!
फक्त फॅशन पाहून खूप टाइट कपडे घालणे टाळा.
सैल आणि आरामदायी कपडे निवडा
ओव्हरसाईज किंवा फ्लोई स्टाईल्स निवडू शकता
हवा खेळती राहील अशा डिझाईन्स वापरा
यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहते.
ऑफिससाठी स्मार्ट आणि प्रॅक्टिकल स्टाइल निवडा!
वर्किंग महिलांसाठी स्टाईल आणि कम्फर्ट यामध्ये संतुलन ठेवणे आवश्यक आहे.
हलके कुर्ते, कॉटन टॉप्स, फ्लोई ड्रेस उत्तम पर्याय आहेत
जास्त लेयर्स टाळा
आरामदायी फुटवेअर वापरा
यामुळे दिवसभर सहज काम करता येते.
त्वचेची काळजी आणि कपड्यांचा संबंध
कपडे योग्य नसतील तर त्वचेवर थेट परिणाम होतो.
घाम अडकला तर पिंपल्स, रॅशेस वाढतात
टाइट कपड्यांमुळे फंगल इन्फेक्शन होऊ शकते
त्यामुळे स्वच्छ आणि हवेशीर कपडे वापरणे अत्यावश्यक आहे.
काही सोप्या टिप्स लक्षात ठेवा
रोज स्वच्छ कपडे वापरा
घाम आल्यावर शक्य असल्यास कपडे बदला
इनरवेअरही कॉटनचे वापरा
हलके आणि मिनिमल मेकअप ठेवा
फॅशनेबल दिसणं महत्त्वाचं आहे, पण त्यासाठी कम्फर्टशी तडजोड करू नये. आजकाल बाजारात अनेक असे पर्याय उपलब्ध आहेत जे स्टायलिश आणि आरामदायी दोन्ही असतात. स्मार्ट फॅशन अवलंबा. म्हणजेच हवामानानुसार कपडे निवडा व शरीराला आराम देणाऱ्या स्टाईल्स वापरा. याने आपण साधेपणातही आकर्षक दिसतो.
उन्हाळ्यात योग्य कपड्यांची निवड ही केवळ फॅशनसाठी नसून, ती आपल्या आरोग्य आणि उर्जेशी थेट जोडलेली आहे. वर्किंग महिलांनी स्टाईल आणि कम्फर्ट यामध्ये योग्य संतुलन राखल्यास दिवसभर ताजेतवाने, आत्मविश्वासपूर्ण आणि ऊर्जावान राहू शकतात.
उन्हाळ्यात तुमची स्टाईल अशी असू द्या जी दिसायलाही छान आणि राहायलाही आरामदायी असेल!

- डॉ. श्वेता राऊत मुळगावकर