सोनं जिद्दीचं : धडपड आणि नवा प्रवास

​​पहिली टू-व्हीलर शिकणं म्हणजे पडणं-उठणं, घाबरणं-धजावणं आणि चुकणं-शिकणं यांचा एक सुंदर प्रवास असतो. आजही ती गाडी चालवते, पण त्या पहिल्या दिवशीचा थरार, ती धडधड आणि तो पहिला यशस्वी फेरा हे सगळं काही वेगळंच होतं.

Story: पहिलं वहीलं |
27th March, 11:32 pm
सोनं जिद्दीचं :  धडपड आणि नवा प्रवास

अगं आई, मला उचलून घे ना. पाय दुखतात आणि ऊन पण किती आहे!" राधिका आईला बिलगून म्हणाली. "तू पण सायलीच्या आईसारखी गाडी चालव ना, मग आपण दोघीही गाडीवरून जाऊ..." राधिकाच्या या बोलण्याने आई जरा विचारात पडली.

​खरं तर गाडी शिकायला हवी, पण कशी आणि कुठे? कोण शिकवणार? ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जायचं तर... नको नको. "मी कॉलेजमध्ये असताना सायकल चालवायचे. आता सायकल चालवून बघते आणि जमलं तर मग शेवटी घरीच गाडी शिकता येईल," राधिकाच्या बोलण्याचा विचार करत दोघी मायलेकी घरी कधी पोहोचल्या, हे त्यांना कळलंच नाही.

​दुपारचं जेवण आणि डायनिंग टेबल आवरता आवरता दुपारचे दोन वाजले. ती अजूनही गाडी कशी शिकता येईल, याच विचारात होती. तेवढ्यात बेल वाजली. दार उघडून बघते तर शेजारच्या आजी; हो, राधिकाची 'शेजीआज्जी'. "या बसा," म्हणत तिने सोफ्याकडे बोट दाखवलं आणि किचनमध्ये मालपोहा आणायला गेली.

​"काय मग, काय म्हणते राधिकाची शाळा?" असे आजींनी विचारताच ती म्हणाली, "काय सांगू, आता मला गाडी शिक म्हणतेय. पण काय करणार, गाडी शिकणं सोपी गोष्ट थोडीच आहे? आणि मला फक्त सायकल येते, तीही कॉलेजमध्ये असताना चालवत होते. आता गेल्या पाच वर्षांत तीही हातात घेतलेली नाही. कुणाची जुनी गाडी मिळाली असती, तर विचार केला असता..." असं म्हणून ती पुन्हा विचारात गढून गेली.

​शेजीआज्जींना काही काम आठवलं म्हणून त्या घरी गेल्या आणि मुलाला फोन करून त्याच्या मित्राची स्कूटी विकायची आहे का, याची माहिती काढली. मित्राने अजून विकली नाही असं सांगताच, "आम्हाला हवी आहे, देशील का?" असे विचारले. त्यानेही होकार दिला. "मी उद्याच काही कामानिमित्त तिकडे येणार आहे, तेव्हा घेऊन येतो. मग घरी जाताना एक दिवस बसने जाईन," असं म्हणून त्याने स्कूटी घरपोच यायची सोय केली.

​दुसरा दिवस उजाडला. राधिका आणि तिची आई शाळेत जायला निघाल्या. दुपारी पप्पा न्यायला येतील, हे कबूल करूनच राधिका शाळेत गेली. राधिकाला शाळेत सोडून ती घरी पोहोचली, तर काय... दारात शेजीआज्जी स्कूटी घेऊन उभ्या होत्या! "ही घे आणि शिक गाडी! माझ्या नातीला शाळेत स्कूटीवरून पोहोचव," त्या म्हणाल्या.

​तो आश्चर्य, आनंद, भीती अशा अनेक भावनांचा कल्लोळ मनात दाटून आल्यामुळे ती फक्त गोड हसली आणि स्कूटीकडे पाहत राहिली. स्वप्न, सत्य, भास आणि आभास याची सांगड घालायला तिला जमेना.

​मग काय, गाडी शिकण्याचा प्रवास सुरू झाला! बायकोची गाडी शिकण्याची तळमळ बघून पतीराजांनी ऑफिसला सुट्टी टाकली आणि 'मिशन स्कूटी ट्रेनिंग'वर रुजू झाले. पहिलं टू-व्हीलर शिकणं म्हणजे केवळ वाहन चालवणं नव्हे, तर स्वतःच्या जबाबदारीवर इतरांच्या जीवाचीही काळजी घेणं असतं.

​आता स्कूटी ट्रेनिंग सुरू झालं. "हातात धरून सायकल चालवतात तशी चालवत ने आणि मग समोरच्या उतारावरून ब्रेक लावून हळूहळू ये," पतीदेवांनी सूचना दिल्या आणि ती 'ट्रेनर' स्कूटी घेऊन निघाली.

​तब्बल पाच वर्षांनी हातात सायकल सोडून थेट गाडी घेतली होती, पण तिला खूप छान वाटलं. "आपण गाडी चालवू," असं तिचं मन तिला सांगत होतं. ती उतारावरून ब्रेक लावून हळूहळू आली. गाडी हळूहळू पुढे सरकत होती. वाऱ्याची झुळूक चेहऱ्यावर येत होती, केस थोडे उडत होते. त्या क्षणी तिला पहिल्यांदाच जाणवलं, ‘अरे, आपण स्कूटी चालवत आहोत! गाडी आपल्याच नियंत्रणात आहे.’ हा क्षण छोटासा होता, पण त्यातला आनंद खूप मोठा होता.

​प्रयत्नांवर प्रयत्न सुरू राहिले. कधी गाडी बंद पडायची, कधी वेग वाढायचा, तर कधी वळण चुकायचं. पण प्रत्येक वेळी ती पुन्हा बसायची, पुन्हा सुरू करायची. अंगणाचा तोच फेरा, तोच रस्ता, पण प्रत्येक फेरीत तिला थोडं अधिक शिकल्यासारखं वाटायचं.

​एक वेळ अशी आली की कोणाचाही आवाज ऐकू येईना, सूचना थांबल्या. ती एकटीच होती...ती, गाडी आणि रस्ता! ब्रेक आणि रेसचे गणित आपोआप जुळून आले. हँडल हलके वाटू लागले आणि गाडी सरळ धावली. त्या क्षणी मनात समाधान आणि आनंद पसरला. भीती मागे पडली आणि आत्मविश्वास पुढे आला.

​तिने थोडं अंतर पार केलं, वळण घेतलं, ब्रेक लावला... सगळं नीट झालं! गाडी थांबवली तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचं हसू लपवता येत नव्हतं.

​पहिली टू-व्हीलर शिकणं म्हणजे पडणं-उठणं, घाबरणं-धजावणं आणि चुकणं-शिकणं यांचा एक सुंदर प्रवास असतो. आजही ती गाडी चालवते, पण त्या पहिल्या दिवशीचा थरार, ती धडधड आणि तो पहिला यशस्वी फेरा हे सगळं काही वेगळंच होतं.

​आजही जेव्हा टू-व्हीलरची किल्ली हातात येते, तेव्हा मनाच्या एका कोपऱ्यात ती 'नवशिक्या' उभी असते; थोडी घाबरलेली, थोडी उत्सुक, पण पूर्णपणे आनंदी! आणि प्रत्येक वेळी गाडी सुरू करताना आतून एकच आवाज येतो, "आपण शिकलोय... आणि तेवढंच पुरेसं आहे!”


- मंजिरी वाटवे