आमच्या गोयची देवभूमी खरंच उदार, लेकरांची काळजी घेणारी. ताजे मासे हा आमचा आत्मा, आमचे मुख्य अन्न; पण उन्हाळ्यात त्याची उणीव भासू नये याची पुरेपूर खबरदारी घेते आमची देवभूमी.

मार्च महिना जवळ जवळ संपत आला आहे. आत्ताच अंगाची लाही लाही होत आहे, मग मे महिन्यात काय होणार हाच प्रश्न पडलाय सर्वांना. आमच्या गोव्यात ना सगळंच एकदम भारी! आमचे नारळ, काजू, सुपाऱ्या भारी; आमचे कलागुण भारी; आमचे नुस्ते भारी, तसाच आमचा उन्हाळाही भारी आणि हल्ली तर लई भारी. असो!
आम्ही शाळेत होतो तेव्हा मार्च महिन्याच्या शेवटी आमच्या वार्षिक परीक्षा संपत असत. सगळे टेन्शन निदान दोन महिने तरी उतरत असे. पार मोकाट सुटत असू आम्ही. तुम्हाला माहितीये, अनेकजण 'उन्हाळा नको गं बाई!' असे म्हणतात, पण आम्हाला मात्र उन्हाळी सुट्टी म्हणजे जीव की प्राण. कारण माहिती आहे? ‘खादाडी’... हो फक्त खादाडी. अख्खा एप्रिल-मे दिवसभर कच्च्या कैऱ्या, काजूगर, बोंडू, गावठी पेरू, फणस, आडसरे... अहो लयलूट नुसती!
मार्च महिन्यात सुरुवातच होत असे काजूनी. आमची भलीमोठी काजूची बाग होती, 'वरखटा' म्हणतात त्याला. रोज सकाळी आई आणि आजी टोपली आणि गेखला घेऊन काजू काढायला जात. सोबत आमचे लटांबर असेच. सकाळी चपाती आणि चून-चटणी, फेजाव किंवा कधी पोहे खाऊन निघत असू. काजूचे ते रसरशीत बोंडू बघूनच तोंडाला पाणी सुटे. अगदी वरखट्यावर कामाला कामेरी असत, त्या रसाने भरलेले लाल-पिवळे बोंडू देत. खूप मजा येई. दुपारी घरी आल्यावर अक्षरशः घामाने निथळत असू आम्ही. पण त्याचेही 'सोल्युशन' हजर होते. घरामागच्या थंडगार अशा पाटाच्या पाण्यात मस्त पहुडल्यानंतर - हो, हो त्या उथळ दगडी बांधणीच्या पाटातील थंडगार पाण्यात पहुडले म्हणजे खरेच स्वर्गीय आनंद! अशा आंघोळीनंतर जी कडकडून भूक लागे, ती पानात फणसाचे खतखते, कच्च्या केळ्यांची कापा, केळफुलाची भाजी पोटात गेल्यावरच शमत असे. त्यात ओल्या काजूची भाजी म्हणजे पर्वणीच हो!
केळफुलाची भाजी बारीक विळीवर चिरणे ही सुद्धा एक कला आहे बरं का. माझी आजी आणि माझी धाकटी बहीण रिना अतिशय कौशल्याने केळफूल चिरत असत. आता एवढे तुडुंब जेवून सुद्धा 'आराम' हा प्रकार माहीतच नव्हता. अहो, समजा दुपारी झोपलो आणि आदल्या दिवशी हेरून ठेवलेले पेरू किंवा घोट गायब झाले तर? कारण आमच्यासारखे चोर अगदी घराघरात होते. माझी एक मैत्रीण तर छोटासा चाकूच घेऊन यायची पेरू कापायला; उगाच मग कमी-जास्त वाटे व्हायला नको! आमच्याकडे 'कॅमी' नावाची कुत्री होती. आम्हा पोराटोरांबरोबर ती सुद्धा येत असे कुळागरात. कोणी येताना दिसले की जोरजोराने भुंकून सावध करायची.
बऱ्याचदा रविवारी वगैरे पाहुणे असायचे, मग आजी हिराबायला कापा फणस काढायला लावायची. साधारणतः संध्याकाळच्या वेळेस हाताला तेल लावून मोठी कोयती घेऊन आई रुबाबात बसे फणस कापायला आणि आम्ही सगळे अन् पाहुणे समोर गोल बसत. काय गोडवा हो त्या फणसाला! आणायला आणि कापायला जेवढे कष्ट, तेवढाच गोडवा भारी नुसता. अर्थात, मग एक तास पाणी प्यायला बंदी असायची, तो भाग वेगळा.
आमच्या मागच्या परसात दोन आंब्याची झाडे होती. दरवर्षी आलटून पालटून घोट लागत त्याला, ते सुद्धा अगदी घोसाने. थोडी आजी 'पाडेली'कडून कच्ची उतरवून घेत असे आणि मीठ लावून दोणात ठेवत असे. कुळागरात एक आंबा होता, त्याच्या कच्च्या कैऱ्यांचे लोणचे करायची आई. पेजेबरोबर किंवा जेवणाबरोबर ताज्या कैरीचे लोणचे थोडे खाऊन पाहा, काय रूच येते सांगू! परसात आवाज झाला की धावत जात असू आम्ही पिकलेल्या कैऱ्या गोळा करायला. आई फार सुंदर घोटांचे सासव करायची. हुमणात एखादी कच्ची कैरी टाकली तर वेगळीच चव येत असे.
बाबा येताना हमखास 'मानकुराद' आंबे आणत. भारतात सगळे हापूसला आंब्याचा राजा म्हणतात, त्यांना कुठे माहिती की खरा राजा मानकुराद आहे हे! अहो, स्टॉलवर हापूस विकणारे गोवेकर घरात मात्र आवडीने मानकुरादच खातात. आमचा राजा मानकुरादच! मुंबईकर आले की मग एका संध्याकाळी काजी भाजण्याचा कार्यक्रम होई. चुलीवर कापलेल्या डब्याचा पत्रा आणि त्यावर काजी भाजत. गरमागरम नुकतेच फोडलेले काजूगर खाल्लेले लोक आम्ही! सोललेले काजू, खारे काजू हे नखरे मुंबईकरांनीच करायचे.
आमच्या गोयची देवभूमी खरंच उदार, लेकरांची काळजी घेणारी. ताजे मासे हा आमचा आत्मा, आमचे मुख्य अन्न; पण उन्हाळ्यात त्याची उणीव भासू नये याची पुरेपूर खबरदारी घेते आमची देवभूमी. आज शहरात राहणारी मी जेव्हा ओल्या काजूचे वाटे बघते ना बाजारात, तेव्हा माझेच मला हसू येते, पण सांगू कुणाला...

रेशम जयंत झारापकर, मडगाव, गोवा.