वृद्धाश्रम... एक नवीन दृष्टिकोन माझाही

या संकल्पनेला 'आई-वडिलांसाठीचा तिरस्कार' किंवा 'वृद्ध वडीलधारी म्हणजे कटकट' अशा कटू व्याख्येने शापित न करता, ही संकल्पना एक 'खुली व्यवस्था' आहे, जिथे प्रत्येक आजी-आजोबा आपापल्या इच्छेनुसार ये-जा करू शकतात, हे समाजाच्या मनावर बिंबवले पाहिजे.

Story: ललित |
27th March, 09:02 pm
वृद्धाश्रम...  एक नवीन दृष्टिकोन माझाही

​वृद्धाश्रम’ या शब्दात एका प्रकारचे कारुण्य जाणवते, आई-वडिलांप्रती मुलांचा द्वेष आठवतो व आपोआपच मग मन घरातील तरुण मुलगा, मुलगी, सून या सर्व नात्यांच्या विरोधात पेटून उठते. सहानुभूतीचे पारडे मात्र वृद्ध आई-वडिलांच्या बाजूलाच झुकले जाते. प्रत्येक मनुष्याचा विचार हा बहुदा असाच असतो.

​"आपले संपूर्ण आयुष्य आई-वडिलांनी या पोरांसाठी झिजविले आणि आता या तरुण पोरांना आई-वडीलच नको झालेत!" हा टोमणा ९९ टक्के शेजारी, नातलग आणि समाज मारतोच. पण नाण्याच्या दोन्ही बाजू पडताळून पाहणे व त्यानंतरच शेरेबाजी करणे यातच खरे शहाणपण असते. आपण धुतल्या तांदळाप्रमाणे स्वच्छ असल्यासारखे दुसऱ्यांच्या घरांवर दगड मारणे ही माणसाची प्रवृत्ती आहे; म्हणूनच आजचे लिखाण हे एकतर्फी न ठेवता, जरा विस्तीर्ण विचार करून लिहिणे योग्य वाटले.

​आई-वडील हे प्रत्येक मुलाचे श्रद्धास्थान असतात. ज्या माऊलीने आपणाला या जगात आणले, ज्या वडिलांनी आपणाला अंगाखांद्यावर खेळवले, असे आपले जन्मदाते सर्वांना प्रियच असतात. जन्मभर त्यांची सेवा करून प्रत्येक सुख त्यांना त्यांच्या उतारवयात देता यावे, ही प्रत्येक पाल्याची इच्छा नक्कीच असते.

​तर मग वृद्धाश्रमांची संख्या ही का वाढत चालली आहे? हा विषय जेवढा सरळ-सोपा वाटतोय, तेवढा नाही. आपण लहान असताना आपली आई जर अगदी शिस्तप्रिय होती, तर ती आपल्या मुलांकडूनही तीच अपेक्षा ठेवायची. त्यात मग जराशी भूलचूक झाली की हमखास माराचा भडिमार व्हायचा. त्यातच आई जर जास्त शिकलेली नसेल किंवा एकदमच अंगठाछाप असेल, तर मात्र शिव्याशाप चुकायचे नाहीत. पण तीही एका प्रकारची मायेचीच बाजू असल्याने त्याचा होणारा मनस्ताप त्या कोवळ्या जीवाला सोसावाच लागायचा. तरीही आई मोठी असते, राग असतोच, पण आपण लहान असल्याचे भान असायचे. हेच वडिलांच्या बाबतीतही असू शकतं. त्यात जर व्यसन सोबतीला असले तर मात्र ते बाबा म्हणजे शिव्याशापांची 'फॅक्टरी'च असत.

​रोजच्या रोज मुलांना फक्त धमकावण्यात, मोठे असल्याच्या धाकाखाली चिरडून, त्यांचे बालपण आपापल्या परीने जर खुंटवत ठेवले आणि अशा कठोर बळजबरीच्या ओझ्याखाली जे मूल मोठे होते, ते मनातून त्या आई-वडिलांप्रती तिरस्कार घेऊनच वाढत जाते. वाढलेल्या तरुणाईवर पुढे तीच विनाकारण बळजबरी, केवळ आपला वृद्धपणाचा ठसा कायम ठेवण्याच्या हेतूने वापरली गेली, तर मात्र जे खटके उडू शकतात ते शेवटी "तू किंवा मी" या परिस्थितीवर येऊन ठेपतात आणि मग वृद्धाश्रमाचा एकमेव मार्ग खुला होतो.

​प्रत्येक पिढीमधला आचार-विचारांचा फरक जाणीवपूर्वक जर जपला गेला नाही, तर वृद्धाश्रम ही काळाची गरज होत जाणार. प्रत्येक नातं हे जर सामंजस्याने, पिढींमधल्या बदलानुसार थोडंफार नमते घेत सांभाळलं, आपणहूनच जराशी विश्रांती घेऊन व नवीन पिढीला जबाबदारी देऊन जर आपली गती मंद करून घेतली, तर वेगवेगळ्या पिढींमधील नात्यांची रेलगाडी सुरळीत ट्रॅकवरून चालत राहील आणि गैरसमजाच्या अपघातांचे प्रमाण आपोआपच कमी होत जाईल.

​एक साधे उदाहरण घेतले तर आमचे आई-वडील कधीतरी आपल्या आजी-आजोबांबद्दल (त्यांच्या आई-वडिलांबद्दल) सांगायचे की, "माझ्या आईचे व तिच्या सासूचे कधी-कधी पटत नसे; भांड्याला भांडं लागायचंच. मग बाबा किंवा आजोबा कसेतरी त्यांचे भांडण निवारण करायचे." तसेच बाबा व आजोबा देखील कधीतरी या ना त्या कारणावरून वाद घालायचेच. यावरून आपल्याला नक्की कळून येते की, 'Generation Gap' हा प्रत्येक पिढीत हमखास असतोच. हा निसर्गाचा नियमही आहे.

​त्यामुळेच जर वृद्ध व्यक्तींनी एका वयानंतर आपणहून आनंदाने सांसारिक जाचातून निवृत्ती स्वीकारली व संसाराचे स्टिअरिंग पुढील पिढीच्या हाती देऊन स्वतः एक उत्तम मार्गदर्शक म्हणून खुर्ची सांभाळली, तर नात्यांमध्ये कटुता येणार नाही. एकमेकाबद्दल आदरही कायम राहील. घरात जाणते, कर्तबदार वडीलधारे आहेत याची सुंदर जाणीव तरुण पिढीला होत राहील व या बहरदार वटवृक्षाखाली नवीन बालपिढी छान बहरून तयार होईल.

​वृद्धाश्रम ही संकल्पना फार छान आहे. या संकल्पनेला 'आई-वडिलांसाठीचा तिरस्कार' किंवा 'वृद्ध वडीलधारी म्हणजे कटकट' अशा कटू व्याख्येने शापित न करता, ही संकल्पना एक 'खुली व्यवस्था' आहे, जिथे प्रत्येक आजी-आजोबा आपापल्या इच्छेनुसार ये-जा करू शकतात, हे समाजाच्या मनावर बिंबवले पाहिजे.

​जसे तरुण वयात आपणाला इतर तरुणांसोबत वेळ घालवायला आवडतो, बालपणात आपण आपल्या बालमित्रांसोबत रमतो, तसेच उतारवयातही वृद्ध आजी-आजोबांना त्यांच्या वयाच्या सोबत्यांसोबत वेळ घालवायला आवडतो. असे वाटत असल्यास तो त्यांचा अधिकारच आहे आणि ही वस्तुस्थिती आपण समाजाला पटवून दिली, तर 'वृद्धाश्रम' हा शाप नसून एक सुंदर पर्याय आहे, हे सत्य समजून घ्यायला वेळ लागणार नाही.

​ज्याच्या त्याच्या स्वतःच्या निर्णयानुसार आश्रमात किती काळ राहायचे, हा आजी-आजोबांचा निर्णय असेल. शेवटी जे जीवन आपल्याला मिळालेले आहे ते आनंदात, सुखाने आणि आपल्या इच्छेनुसार व्यतीत करणे हा मनुष्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे. हो ना?

​पटल असेल तर नक्की प्रतिक्रिया कळवा!


- राधा गोपी गाड