आजचा हरवलेला माणूस

​घरात असलेला प्रत्येक माणूस एकमेकांकडे संवाद कमी आणि मेसेज जास्त करताना दिसतो. 'गुड मॉर्निंग' म्हणण्यापासून ते काही सांगायचे देखील असले तरी मेसेज पाठवतात. मधल्या गोष्टींची भावना पोहोचत नाही.

Story: ललित |
20th March, 09:38 pm
आजचा  हरवलेला माणूस

मा​णूस म्हणून जन्माला येणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. माणसात असलेल्या माणुसकीमुळे तो आपले वेगळे जीवन जगत असतो. माणसातील जर माणुसकीच हरवली तर मग माणसात आणि जनावरात काही फरक उरणार नाही. बऱ्याच वेळी आपण ही उदाहरणे बघत असतो किंवा कोणीतरी आपल्याला सांगितलेली असतात. माणसाला बोलायला येते, तो आपल्या भावना व्यक्त करू शकतो, हे गुण त्याला निसर्गाकडून मिळाले आहेत. कारण हे गुण किंवा शक्ती आपण प्राण्यांमध्ये बघू शकत नाही. जनावर माणसासारखे बोलत नाही किंवा त्यांना भावना व्यक्तही करता येत नाही. आजचा माणूस हा हरवलेल्या माणसासारखा वाटत आहे.

​बालपणापासून आता सर्व काही बदलत चालले आहे. अगोदर मुले चालत शाळेत जायची, येता-जाता मजा-मस्ती, गप्पागोष्टी करून आपला वेळ अगदी उमेदीने घालवायची. शाळेत सुद्धा मधल्या सुट्टीत सगळी मुले मैदानावर खेळताना दिसायची. घरी डबा आणायची. संध्याकाळी परत घरी गेल्यावर मित्र एकत्र येऊन खेळायचे, प्रार्थना म्हणायचे. अशा रीतीने अगदी आनंदाने जगताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज आपल्याला दिसून यायचे.

​ह्या सगळ्याच्या उलट आता आपण पाहतो. प्रत्येक मुलाने आई-वडील त्याला गाडीमध्ये शाळेत सोडायला आणि न्यायला येतात, ज्याच्यामुळे त्यांचा चालण्याचा व्यायाम होत नाही. शाळेत खेळाच्या तासाला सुद्धा बरीच मुले वर्गात बसलेली दिसून येतात, कारण त्यांना खेळण्याची सवय आणि गोडी नसते. आता जास्तीत जास्त मुले हॉटेल किंवा कॅन्टीनमध्ये खाताना दिसतात. त्यांना घरून डबा आणायला लाज वाटते. तरी बरेच पालक डबा सक्तीने देतात म्हणून मुले आणतात, तर काही पालकांना वेळ मिळत नाही डबा बनवायला. मुले घरी गेल्यावर मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये घुमलेली दिसतात. बरेच जण एकदा हातात मोबाईल घेतला की आजूबाजूला काय घडत आहे याचे भान त्यांना राहत नाही.

​अगोदर आपण कुठेही गेलो तर त्या प्रवासाची आठवण कायम राहायची. कारण नवनवीन माणसे भेटायची, बोलायची. जाता-येता गाठीभेटी व्हायच्या, असा प्रवास असायचा. आता प्रत्येक जण मान खाली घालून मोबाईल बघत असतो. शेजारी कोण बसले आहे, की ओळखीचे आहे, याची काहीच माहिती नसते. बसमध्ये तर बरेच जण आपल्याला स्टॉपवरून उतरताना पुढे जातात हे आपण बघितलेले असणार. आता फक्त प्रवासातले फोटो काढणे, रील बनवणे हेच चालू असते. खरा आनंद आपण गमावून बसतो. कोणतीही गोष्ट मनापासून करण्याऐवजी प्रसिद्धीसाठी करण्याची जणू आता एक फॅशन आली आहे.

​घरात असलेला प्रत्येक माणूस एकमेकांकडे संवाद कमी आणि मेसेज जास्त करताना दिसतो. 'गुड मॉर्निंग' म्हणण्यापासून ते काही सांगायचे देखील असले तरी मेसेज पाठवतात. मधल्या गोष्टींची भावना पोहोचत नाही. नातेवाईकांच्या गाठीभेटी देखील काही कार्यक्रम असला तरच होतात, नाहीतर फोनवर विचारपूस करण्याशिवाय काही नाही. पूर्वी लोक आपल्या नातेवाईकांकडे जाऊन राहायचे, बोलायचे, पण आता ते होत नाही. कारण प्रत्येकाचे कारण असते की वेळ मिळत नाही.

​पूर्वी कोणी माणूस पडला किंवा कोणाला अपघात झाला तर त्याला उचलून पाणी वगैरे देणे, त्याची विचारपूस करणे असा प्रकार होता. आता याच्या उलट, पडलेल्या माणसाचा व्हिडिओ बनवणे किंवा कोणी पडताना पहिले तरी आजूबाजूचे लोक फोटो काढण्यात किंवा रील बनवण्यात मग्न असतात. अपघात वगैरे झाला तर ती गंभीरता बाजूला ठेवून त्याचा व्हिडिओ कोणी पहिल्यांदा काढला याचे भान लोकांना जास्त असते. हे बघून कुठेतरी वाटते की आपली मानसिकता बदलत चाललेली आहे.

​असे म्हणण्यापेक्षा की वेळ-काळानुसार आपल्याला बदलले पाहिजे. पण वेळ ही बदलत असताना असे वाटते की आपण आपली माणुसकी जपून ठेवून माणुसकीचा विचार ठेवला पाहिजे. सामाजिक भान राखून इतरांच्या दुःखात, अडचणीत सहभागी व्हायला हवे. नाहीतर काही दिवसांनी माणूस म्हणून जन्माला आल्याची लाज वाटेल.


- स्नेहल महाले

पणजी