मडगाव पाठोपाठ पर्वरीतही बनावट नोटांचा सुळसुळाट

पर्वरी एचडीएफसी बँकेत बनावट नोटा जमा, बँक खातेधारक महिलेविरुद्ध गुन्हा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30 mins ago
मडगाव पाठोपाठ पर्वरीतही बनावट नोटांचा सुळसुळाट

म्हापसा :  मडगाव येथील आयडीबीआय बँकेत ५०० रुपयांच्या तब्बल ९८ बनावट नोटा जमा झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पर्वरी येथेही असाच प्रकार उघडकीस आला.  

आल्तो, पर्वरी येथील एचडीएफसी बँक शाखेमध्ये पाचशे रुपयांच्या सात बनावट नोटा जमा करण्यात आल्या. याप्रकरणी पोलिसांनी बँक खातेधारक मैबूबा डी. यालगी (रा. बिजापूर, कर्नाटक) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बनावट नोटा जमा करण्याचा प्रकार गुरुवार, ५ मार्च रोजी घडला होता. तर शुक्रवार २० मार्च रोजी बँकेचे शाखा व्यवस्थापक विकास जरियाल यांनी पर्वरी पोलिसांत तक्रार दिली.

संशयित आरोपीचे बँक खाते एचडीएफसी बँकेच्या बागेवाडी, कर्नाटक येथील शाखेत आहे. तिने पर्वरी शाखेमार्फत आपल्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा केली होती. या रकमेपैकी साडेतीन हजार रुपये असलेल्या पाचशे रुपयांच्या सात नोटा बनावट होत्या. नोटा तपासणी मशीनद्वारे हा प्रकार आढळून आला.

बनावट नोटा खऱ्या असल्याचे भासवून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणे, तसेच बँकेची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली पर्वरी पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या १७८, १७९ व १८० कलमान्वये गुन्हा नोंद केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन शिरोडकर हे करीत आहेत. 

हेही वाचा