आसगावमध्ये ग्रीक नागरिकाकडून २३.८१ लाखांचा ड्रग्ज जप्त

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th March, 11:29 pm
आसगावमध्ये ग्रीक नागरिकाकडून २३.८१ लाखांचा ड्रग्ज जप्त

म्हापसा : सोनारखेड आसगाव येथे हणजूण पोलिसांनी छापा टाकून २३ लाख ८१ हजार रुपयांचा चरस आणि एक्टसी हा ड्रग्ज जप्त केला. या प्रकरणी संशयित आरोपी सोक्राटीस वासिलिओस मिचैलिडीस (५९, रा. बादे आसगाव) या ग्रीक नागरिकाला पोलिसांनी अटक केली.

ही कारवाई पोलिसांनी बुधवार दि. १८ रोजी उत्तररात्री केली. सोनारखेड, आसगाव येथे ड्रग्जचा विक्री व्यवहार होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचला.

संशयित आरोपी हा ड्रग्ज तस्करीसाठी घटनास्थळी आला असता पोलिसांनी त्याला पकडले. झडतीवेळी संशयित विदेशी नागरिकाजवळ २२ लाख ७१ हजार रुपये किमतीचा २.२७१ किलो चरस आणि १ लाख १० हजारांचा १०.७७ ग्रॅम एक्टसी मिळून एकूण २३ लाख ८१ हजारांचा मादक पदार्थ सापडला.

संशयित आरोपीविरुद्ध ड्रग्ज प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. त्याच्याजवळील ड्रग्ज जप्त करण्यात आला. संशयित आरोपीला म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

पोलीस अधीक्षक हरिष मडकईकर, विल्सन डिसोझा व निरीक्षक सूरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विराज नाईक, कॉ. प्रकाश पोळेकर, गौरव साळगावकर, अनिकेत पेडणेकर, गौरेश रेडकर, दीपराज नागवेकर यांनी ही कामगिरी केली. 

हेही वाचा