भरमसाठ रकमेमुळे ग्राहकांत संताप

पणजी : मार्च महिन्यात राज्यातील अनेक भागांमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त रकमेची वीज बिले आल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. याबाबत चौकशी करण्याची मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, वीज खात्याचे अनेक अधिकारी ‘एसआयआर’ संबंधित कामांत व्यस्त होते. यामुळे दैनंदिन रीडिंग आणि बिलिंग प्रक्रियेत काहीसा विलंब झाला, अशी ग्वाही वीज खात्यामार्फत देण्यात आली.
फोंडा युवा काँग्रेसनेही यासंदर्भात वीज खात्याच्या फोंडा कार्यालयात निवेदन सादर केले आहे. दरम्यान, वाढीव बिलांचे कारण तांत्रिक दोष किंवा मीटर रीडिंगमधील चुका असू शकतात, असा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे वीज खात्याने याची सखोल चौकशी करून ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
वीज खात्याचे अभियंते वल्लभ सामंत यांनी मात्र सर्वत्र वाढीव बिले दिल्याचा आरोप फेटाळला आहे. काही ठिकाणी जास्त दिवसांचे बिल एकत्र आल्याने रक्कम वाढली असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. तसेच उन्हाळ्यामुळे एसी व पंख्यांचा वापर वाढल्याने वीज वापरही वाढतो, असे त्यांनी सांगितले.
फोंडा युवा काँग्रेसने वीज खात्याच्या चुकीमुळे वाढीव बिले आल्याचा आरोप करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. ग्राहकांवर अन्याय होऊ नये आणि योग्य तो दिलासा मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हजाराच्या जागी दोन-अडीच हजारांचे बिल
अनेक ठिकाणी साधारण हजार रुपयांच्या ऐवजी दोन ते अडीच हजार रुपयांची बिले आल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. डिचोली, साखळी, म्हापसा, पेडणे, फोंडा आदी भागांतून अशा प्रकारच्या तक्रारी समोर आल्या आहेत. काही ग्राहकांनी थेट वीज खात्याच्या कार्यालयात जाऊन नाराजी व्यक्त केली आहे.