डिचोलीत एकाच घरात वडील, मुलाचा आढळला मृतदेह

नाईकनगर-बोर्डे परिसरातील घटना : पोलिसांच्या हाती लागली बारा पानी चिठ्ठी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16th March, 11:28 pm
डिचोलीत एकाच घरात वडील, मुलाचा आढळला मृतदेह

डिचोली : नाईकनगर-बोर्डे येथे एका घरात वडील आणि मुलाचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सोमवारी, १६ मार्च रोजी संध्याकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. मृत संजय म्हापसेकर आणि त्यांचा मुलगा संचित म्हापसेकर या दोघांचेही मृतदेह एकाच खोलीत आढळून आले असून, रात्री उशिरापर्यंत पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळी तपास सुरू होता.

घटनेची माहिती मिळताच डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, माजी आमदार नरेश सावळ आणि भाजप मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संजय म्हापसेकर हे परिसरात एक सक्रिय कार्यकर्ते म्हणून परिचित होते. संध्याकाळी त्यांची मुलगी कामावरून घरी परतल्यानंतर तिला वडील जमिनीवर आणि भाऊ कॉटवर निपचित पडल्याचे दिसले. तिने तत्काळ मामांना आणि स्थानिकांना माहिती दिली, त्यानंतर १०८ रुग्णवाहिका आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलीस निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली फॉरेन्सिक पथकाने रात्री ९.३० च्या सुमारास घटनास्थळाची पाहणी केली. प्राथमिक माहितीनुसार, संजय म्हापसेकर यांच्या तोंडातून फेस आला होता, तर मुलगा संचित याच्या तोंडाला मार लागल्याने रक्तस्त्राव झाला होता. पोलिसांनी घटनास्थळावरून संजय म्हापसेकर यांनी लिहिलेली १२ पानी चिठ्ठी हस्तगत केली असून, या चिठ्ठीत घटनेबाबत महत्त्वाच्या सूचना आणि माहिती असल्याचे समजते.

दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोमेकॉमध्ये पाठवण्यात आले असून, मंगळवारी शवचिकित्सा केली जाणार आहे. मृत्यूचे नेमके कारण आणि वेळ शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून पोलीस सखोल तपास करत असल्याचे नमूद केले.

#BicholimNews #GoaPolice #TragicIncident #ForensicInvestigation #BicholimMLA #GoaNews #MapsekarFamily