काँग्रेस, भाजप, आपकडून मोर्चेबांधणीला वेग

प्रतिनिधी। गोवन वार्ता
फोंडा : फोंडा विधानसभा मतदारसंघात ९ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार असून त्यासाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. काँग्रेस, भाजप आणि आम आदमी पक्षाच्या (आप) उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत उमेदवारांची नावे जाहीर होणार आहेत.
भाजपकडून विद्यमान नगरसेवक तथा स्व. रवी नाईक यांचे सुपुत्र रितेश नाईक आणि नगरसेवक विश्वनाथ दळवी यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. रवी नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर फोंड्यात प्रथमच भाजपने विजय नोंदवला होता. त्यामुळे पोटनिवडणुकीत विजयासाठी अधिक प्रयत्न करण्याची वेळ भाजपवर येऊ शकते. फोंड्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विविध कार्यक्रमांद्वारे मतदारांच्या गाठीभेटी घेऊन प्रचाराला सुरुवात केली आहे.
‘आप’ने काही दिवसांपासून मतदारसंघांत अनेक उपक्रम सुरू केले आहेत. त्यामुळे ‘आप’चा उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. एका महिला काँग्रेस कार्यकर्तीने नुकताच ‘आप’मध्ये प्रवेश केला. पुढील काही दिवसांत आणखी काही कार्यकर्ते ‘आप’चा रस्ता धरण्याची शक्यता आहे. पक्षाने अद्याप उमेदवार निश्चित केला नसला तरी पुढील काही दिवसांत उमेदवाराची घोषणा शक्य आहे.
..
बॉक्स
भाटीकर, वेरेकर यांच्यापैकी कोण ?
केतन भाटीकर यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतल्यामुळे मतदारसंघात चर्चेला उधाण आले आहे. मतदारसंघात राजेश वेरेकर सक्रिय असताना पक्षश्रेष्ठींनी केतन भाटीकर यांना पक्षात प्रवेश दिल्यामुळे राजकारणाची दिशा बदलण्याची शक्यता आहे. भाटीकर आणि वेरेकर यांनी २०२२ साली एकमेकाविरुद्ध निवडणूक लढविली होती. यावेळी काँग्रेसची उमेदवारी कोणाला मिळते याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.

काँग्रेस प्रदेश निवडणूक समितची आज बैठक
पणजीत सोमवारी सायंकाळी काँग्रेस प्रदेश निवडणूक समितीची बैठक होणार आहे. या बैठकीला गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत फोंडा पोटनिवडणुकीसाठीच्या उमेदवाराबाबत चर्चा करून केंद्रीय समितीला नावे पाठवली जातील. केंद्रीय समिती उमेदवार निश्चित करेल. पक्षाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाईल. गोवा फॉरवर्डशी आमची युती कायम राहील. आप आणि आरजी यांनी निर्णय घ्यायचा आहे. भाजपचा पराभव व्हावा, असे त्यांना वाटत असेल तर त्यांनी आमच्या युतीत सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केले.
फोंडा पोटनिवडणुकीसाठी पक्षाच्या राज्य निवडणूक समितीच्या बैठकीत दोन नावे उमेदवारीसाठी निश्चित झाली आहेत. दिल्लीतील बैठकीनंतर उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात येईल. पुढील दोन दिवसांत मी व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत दिल्लीला जाणार आहोत. त्या ठिकाणी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाईल.
- दामू नाईक, प्रदेशाध्यक्ष, भाजप