अंतिम निर्णय भाजपचा

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : महापौर रोहित मॉन्सेरात आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत महसूलमंत्री बाबूश मॉन्सेरात यांनी दिले. तिसवाडी तालुक्यातील एखाद्या मतदारसंघातून ते निवडणूक लढवू शकतात; मात्र अंतिम निर्णय भारतीय जनता पक्ष घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रुडंट मीडियाच्या ‘हेड ऑन’ कार्यक्रमात ते बोलत होते. या मुलाखतीत त्यांनी रोहित यांच्या राजकीय भवितव्याबाबत भाष्य केले. मंत्री बाबूश म्हणाले की, रोहित मॉन्सेरात हे भाजपमध्येच राहतील आणि पक्ष जो निर्णय घेईल त्याचे ते पालन करतील. आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा आहे. कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची याचा निर्णय पक्ष घेईल. मात्र तिसवाडी तालुक्यातील एखाद्या मतदारसंघातून ते निवडणूक लढवू शकतात.
जिंकण्याची क्षमता असलेल्यांवर पक्ष विश्वास ठेवतो
उमेदवारीबाबत अंतिम निर्णय पक्ष नेतृत्व घेणार असून जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांवर पक्ष विश्वास ठेवतो, असे मत बाबूश मोन्सेरात यांनी व्यक्त केले. पक्ष कोणालाही उमेदवारी देऊ शकतो; मात्र जिंकण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीवर विश्वास ठेवणे आवश्यक असते, असेही त्यांनी नमूद केले.