निधनाची बातमी कळताच नगरसेवक, चाहत्यांची रुग्णालयाजवळ गर्दी

प्रतिनिधी। गोवन वार्ता
काणकोण : काणकोणचे नगराध्यक्ष लक्ष्मण पागी (४६) यांचे रविवारी रात्री आकस्मिक निधन झाले. पाळोळे येथील घराजवळ ते पडलेले आढळले. लागलीच त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. निधनाची बातमी कळताच क्रीडामंत्री रमेश तवडकर, माजी आमदार विजय पै खोत यांनी रुग्णालयात धाव घेतली.
दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी नगराध्यक्षपदाचा ताबा स्वीकारला होता. त्यांच्या कार्यकाळातच नगरपालिकेच्या नव्या कार्यालय संकुलाचे उद्घाटन करण्यात आले होते. प्रेमळ स्वभावाचे दानशूर व सेवाभावी वृत्तीचे लक्ष्मण पागी विधानसभा निवडणुकीवेळी रमेश तवडकर यांचे प्रचार प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांच्या आकस्मिक निधनाची बातमी कळताच नगरसेवक, चाहत्यांनी रुग्णालयाजवळ गर्दी केली होती. पुढील तपास पोलीस करत आहेत.