गॅस तुटवड्यामुळे मासळी, भाजी विक्रीच्या व्यवसायावर परिणाम

मागणी रोडावल्यामुळे व्यवसायात घट : किनारपट्टीतील व्यावसायिक चिंतेत

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16th March, 11:59 pm
गॅस तुटवड्यामुळे मासळी, भाजी विक्रीच्या व्यवसायावर परिणाम

म्हापसा : व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या तुटवड्याचा परिणाम हॉटेल आणि रेस्टॉरंटपुरता मर्यादित न राहता स्थानिक भाजी व मासळी व्यापाऱ्यांवरही झाला आहे. या व्यापाऱ्यांच्या व्यवसायात मोठी घट झाल्याचे दिसत आहे.
हॉटेल व्यवसायाला सिलेंडरचा पुरवठा कमी होत असल्याने मागणी घटली आहे, ज्याचा थेट परिणाम मासळी आणि भाजीपाला विक्रीवर झाला आहे. इराण-इस्त्रायलमधील वाढत्या संघर्षामुळे देशातील सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे सर्वसामान्यांमध्ये घबराट पसरली असून गॅस एजन्सीबाहेर रांगा लागत आहेत. हॉटेल आणि रेस्टॉरंटना लागणाऱ्या व्यावसायिक सिलिंडरच्या पुरवठ्यावर मर्यादा आल्याने त्याचा फटका आता या व्यवसायाशी संलग्न व्यापाऱ्यांना बसत आहे.
मागील काही दिवसांपासून हॉटेल्स आणि रेस्टॉरंटना गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे आमच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. सुमारे २० ते ३० टक्के व्यवसायात घट झाली आहे. आमचा व्यवसाय हॉटेल आणि रेस्टॉरंट क्षेत्रावर अवलंबून आहे. हीच परिस्थिती भाजी पुरवठा व्यवसायाचीही आहे, अशी माहिती म्हापसा मासळी विक्रेता संघटनेच्या अध्यक्ष शशिकला गोवेकर यांनी दिली.
इतर काही मासळी विक्रेत्यांनीही चिंता व्यक्त केली की, त्यांचा व्यवसाय पूर्णपणे हॉटेल क्षेत्रावर अवलंबून आहे. जर हॉटेल्स बंद झाली, तर त्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल. म्हापसा आणि बार्देशमधील किनारपट्टी भागातील हॉटेलना भाजीपाला पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यांनीही अशाच प्रकारची चिंता व्यक्त केली.

चूल पेटवली; पण सरपणाची समस्या!
गॅसच्या तुटवड्यावर तोडगा म्हणून आम्हाला चुलीचा आधार घ्यावा लागत आहे. कारण व्यवसाय बंद करून चालणार नाही. गॅसचा पुरवठा सुरळीत होईपर्यंत हॉटेल बंद ठेवल्यास कामगार वर्गाच्या उदारनिर्वाहाचा प्रश्न आहे. त्यामुळे अन्न पदार्थ बनवण्यासाठी चूल घालण्याशिवाय पर्याय नाही. परंतु आगीसाठी लागणाऱ्या आवश्यक जळावू लाकडांची समस्या आहे, असे हॉटेल व्यवसायिक मोहन सावंत यांनी सांगितले.