केवळ तीन प्रकरणांचा अंतिम अहवाल पूर्ण

पणजी : गेल्या सहा वर्षांच्या कालावधीत राज्यातील शाळांमध्ये शिकणाऱ्या १२ मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. यापैकी केवळ तीन प्रकरणांचा पोलिसांकडून अंतिम अहवाल तयार करण्यात आला असून उर्वरित प्रकरणांचा तपास अद्याप सुरू आहे, अशी धक्कादायक माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विचारलेल्या प्रश्नाला गृहमंत्री या नात्याने उत्तर देताना त्यांनी ही सविस्तर आकडेवारी सभागृहासमोर मांडली.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, २०२१ मध्ये फोंडा आणि पर्वरी येथे प्रत्येकी एका प्रकरणाची नोंद झाली. २०२२ आणि २०२६ (आतापर्यंत) मध्ये एकही प्रकरण नोंदवले गेलेले नाही. मात्र, २०२३ या वर्षात सर्वाधिक ५ प्रकरणे उघडकीस आली असून ती कुंकळ्ळी, म्हार्दोळ, पणजी, म्हापसा आणि बायणा येथे प्रत्येकी एक याप्रमाणे नोंदवली गेली आहेत. तसेच, २०२४ मध्ये आगशी आणि डिचोलीत प्रत्येकी एक, तर २०२५ मध्ये आगशीत दोन आणि पर्वरीत एका प्रकरणाची नोंद झाली आहे.
| वर्ष | नोंद झालेली प्रकरणे |
|---|---|
| २०२१ | ०२ |
| २०२२ | ०० |
| २०२३ (सर्वाधिक) | ०५ |
| २०२४ | ०२ |
| २०२५ | ०३ |
| २०२६ (आतापर्यंत) | ०० |
तपासाबाबत माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, २०२१ मधील एका प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तता झाली असून, एका प्रकरणाचा अंतिम अहवाल सादर झाला आहे. २०२३ मधील पाचही प्रकरणांचा तपास सध्या सुरू आहे. याशिवाय २०२४ मधील दोन प्रकरणांचा अंतिम अहवाल सादर झाला असून, २०२५ मधील तीन प्रकरणांची चौकशी अद्याप प्राथमिक स्तरावर सुरू आहे. एकूण १२ प्रकरणांपैकी बहुतांश प्रकरणांचा निकाल अद्याप लागलेला नाही.