काँग्रेसकडून डॉ. भाटीकरांची शिफारस; भाजपकडून दोन नावे समोर

दोन दिवसांत होणार भाजपकडून अधिकृत घोषणा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16th March, 11:04 pm
काँग्रेसकडून डॉ. भाटीकरांची शिफारस; भाजपकडून दोन नावे समोर

पणजी : फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला असून प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारांची नावे निश्चित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपच्या वतीने उमेदवारीसाठी दोन नावे केंद्रीय संसदीय मंडळाकडे पाठवण्यात आली असून, येत्या दोन दिवसांत अधिकृत उमेदवाराची घोषणा केली जाईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिली.

भाजपने माजी मंत्री स्व. रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक आणि विश्वनाथ दळवी यांची नावे दिल्लीला पाठवली आहेत. यामध्ये रितेश नाईक यांनाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आमदार गोविंद गावडे आणि मगो पक्षानेही रितेश नाईक यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला आहे. उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष दिल्लीला जाण्याची शक्यता असून, पक्षाच्या परंपरेनुसार संसदीय मंडळच अंतिम नाव जाहीर करेल.

दुसरीकडे, काँग्रेसनेही आपली रणनीती स्पष्ट केली आहे. नुकतेच पक्षात प्रवेश केलेल्या डॉ. केतन भाटीकर यांच्या नावाची शिफारस प्रदेश काँग्रेसने केंद्रीय निवडणूक समितीकडे केली आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसमधील दुसरे इच्छुक उमेदवार राजेश वेरेकर यांनी डॉ. भाटीकर यांच्या नावाला संमती दिली असून, भाजपचा पराभव करणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार, फोंडा पोटनिवडणुकीसाठी ९ एप्रिल रोजी मतदान होणार असून ४ मे रोजी निकाल जाहीर होईल. उमेदवारी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २३ मार्च (सोमवार) असल्याने राजकीय वर्तुळात मोठी धावपळ सुरू आहे. स्व. रवी नाईक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर आता कोणाची वर्णी लागते, याकडे संपूर्ण गोव्याचे लक्ष लागले आहे.

#PondaByElection #GoaPolitics #BJPGoa #CongressGoa #RiteshNaik #DrKetanBhatikar #GoaNews #Election2026