सांगोल्डा येथे ३८ व्यावसायिक गॅस सिलिंडर जप्त : बार्देश नागरी पुरवठा विभागाची कारवाई

म्हापसा : सांगोल्डा येथे एका निर्जनस्थळी बेकायदेशीरपणे साठवून ठेवलेले ३८ व्यावसायिक गॅस सिलिंडर नागरिपुरवठा खात्याच्या बार्देश विभागाने जप्त केले. यामध्ये १८ भरलेले (सील) आणि २० रिकामी (अन्सिल) सिलिंडरचा समावेश आहे.
ही कारवाई सोमवारी १६ रोजी सांयकाळी ५.३० वा. च्या सुमारास करण्यात आली. नागरी पुरवठा खात्याच्या सहाय्यक संचालिका दीपा फुलारी यांच्या नेतृत्वाखाली बार्देश विभागाचे निरीक्षक राजीव सावंत, उपनिरीक्षक सर्वेश नाईक तुयेकर, वासुदेव शिरोडकर, रोहित तळणकर, सदाशीव खांडेपारकर व भरारी पथकाचे उपनिरीक्षक जीवन पालयेकर या पथकाने ही कामगिरी केली.
सध्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा आहे. त्यामुळे नागरी पुरवठा खात्याने राफयातील सर्व तालुकावार विभागाच्या अधिकाऱ्यांना गॅस सिलिंडरचा काळाबाजार (ब्लॅक मार्केटींग) होऊ नये म्हणून दक्षता ठेवण्याची सूचना केली आहे. त्यानुसार गॅस पुरवठा एजन्सीकडे असलेल्या साठ्याची देखरेख व तपासणी करणी मोहिम खात्याच्या अधिकाऱ्यांकडून केली जात आहे.
याच महिमेदरम्यान बार्देश विभागाचे वरील अधिकारी पथक हे सांगोल्डा भागात तपासणी करत होते. त्यावेळी एका निर्जनस्थळी गॅस पुरवठा करणारे वाहन या पथकाला आढळून आले. या पथकाने सदर वाहनाचा चालक व कामगाराकडे गॅस सिलिंडर बाबतीत विचारपूस करताच त्यांनी घटनास्थळावरून पलायन केले. त्यावेळी या पथकाला सदर ठिकाणी साठवून ठेवलेले काही सिलिंडर सापडले.
टेम्पाेमध्ये सापडले गॅस एजन्सीचे बूक
पथकाच्या तपासणीत एकूण ३८ व्यावसायिक गॅस सिलिंडर असल्याचे आढळून आले. यामध्ये १८ सील तर २० अन्सिल होते. तर जी ०१ झेड १५४५ क्रमांकाच्या गॅसवाहू टेम्पोमध्ये एका गॅस एजन्सीचे बूक सापडले आहे. त्यामुळे हा गॅस सिलिंडरचा साठा सदर एजन्सीचा असल्याचा संशय नागरी पुरवठा खात्याच्या कारवाई पथकाने व्यक्त केला आहे. सदर वाहनासोबत जप्त केलेले हे सर्व गॅस सिलिंडर कायदेशीर कारवाईसाठी साळगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. याप्रकरणी खात्याच्या सहाय्यक संचालिका दीपा फुलारी यांनी पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.