२९८ तक्रारी दाखल : केवळ ९० लाख रुपये परत मिळवण्यात पोलिसांना यश

पणजी : राज्यात मागील तीन वर्षांत सायबर गुन्हेगारांनी ऑनलाईन फसवणूक करून तब्बल १०९ कोटी रुपये लुबाडले आहेत. याचाच अर्थ महिन्याला सरासरी ३.०२ कोटी म्हणजेच दिवसाला सरासरी ९.९५ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. एकूण रकमेपैकी पोलिसांना केवळ ९० लाख रुपये (०.८२ टक्के) रुपये परत मिळवण्यात यश आले आहे. वरील कालावधीत पोलिसांनी ऑनलाईन फसवणुकीच्या २९८ तक्रारी दाखल केल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, २०२३ मध्ये राज्यात सायबर फसवणुकीच्या ८२ तक्रारी दाखल करण्यात आल्या. यावर्षी ६.२९ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले. २०२४ मध्ये ८५ तक्रारी दाखल झाल्या. यात २७.२९ कोटी रुपये लुबाडण्याची तक्रार करण्यात आली. २०२५ मध्ये तक्रारींच्या संख्येसह फसवणूक झालेल्या रकमेत मोठी वाढ झाली. यावर्षी एकूण १३१ तक्रारी दाखल झाल्या. यामध्ये ७५.४१ कोटी रुपये लुबाडण्यात आल्याची तक्रार करण्यात आली.
वर्षनिहाय पाहता २०२३ मध्ये सायबर फसवणुकीद्वारे लुबाडले पैसे परत मिळवण्यात पोलिसांना यश आलेले नाही. २०२४ मध्ये १३.१८ लाख रुपये परत मिळवण्यात आले. तर २०२५ मध्ये ७७.१३ लाख रुपये परत मिळवण्यात पोलिसांना यश आले.
गोवा पोलिसांना सायबर गुन्हे रोखण्यासाठी त्यांचा तपास करण्यासाठी केंद्रीय स्तरावर विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. सायबर पोलीस विभागाला अत्याधुनिक तंत्रद्यान शिकवले जात आहे. तसेच शाळा महाविद्यालये व अन्य ठिकाणी जागृती शिबिरे घेतली जात आहे.
८६६ मोबाईल क्रमांक ब्लॉक
सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सायबर गुन्ह्यांशी संबंधित ८६६ मोबाईल क्रमांक बंद करण्यात आले आहेत. याशिवाय ४४२ संशयित वेब लिंक आणि १६८ सोशल मीडिया खाती देखील बंद करण्यात आली आहेत.