गोव्यातील वास्तव्याला यूके, रशियनांची पसंती

‘सी-फॉर्म’ न भरल्याने २६ जणांवर कारवाई : सहा वर्षांत ८.८२ लाख विदेशी नागरिकांचे वास्तव्य

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
19 mins ago
गोव्यातील वास्तव्याला यूके, रशियनांची पसंती

पणजी : गेल्या सहा वर्षांत राज्यात ८.८२ लाख परदेशी नागरिक गोव्यात राहून गेले आहेत. यात प्रामुख्याने यूके आणि रशियन नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान, या परदेशी नागरिकांना आश्रय देताना सक्तीचे ‘सी-फॉर्म’ न भरल्याच्या आरोपाखाली २६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लेखी उत्तरात दिली.

मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना गृहमंत्री तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सी-फॉर्मबाबतची माहिती दिली.

सी-फॉर्मद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, वर्ष २०२२ ते २०२६ (आतापर्यंत) ८.८२ लाख विदेशी नागरिक गोव्यात वास्तव्यास होते. यात पहिल्या क्रमांकावर २.०७ लाख नागरिकांसह यूके असून, १.८१ लाख नागरिकांसह रशिया दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर ८३,९०५ नागरिकांसह अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर आहे.

देशानिहाय पर्यटकांची आकडेवारी

इतर प्रमुख देशांतून आलेल्या पर्यटकांची संख्या खालीलप्रमाणे आहे.

ऑस्ट्रेलियातील २४४०१, कॅनडाचे १९१८५, डेन्मार्कचे ६३०७, फिनलँडचे ३२५१, फ्रान्सचे २७६०१, जर्मनीचे ४२१३०, ग्रीसचे १२१३, इटलीचे ११८७६, इस्रायलचे २४१०१, जपानचे ७५८८, कझाकिस्तानचे २५०७१, कुवेतमधील ४२०, मलेशियाचे २९२६, न्यूझीलंडचे ४७३३, नेदरलँड्सचे १३३०६, नॉर्वेचे ४६८८, पोलंडचे १५९७४, पोर्तुगालचे ८५४२, कतारचे १४५, स्पेनचे ७८४४, सिंगापूरचे ३९१७, स्वीडनचे ९२४८, स्वित्झर्लंडचे ८५१५, युएईचे ११४७, उझबेकिस्तानचे ४८१६, दक्षिण कोरियाचे ३०९१ याशिवाय इतर देशातील १.२७ लाख नागरिक गोव्यात राहून गेले.

कायद्याचे उल्लंघन आणि कारवाई

या कालावधीत विदेशी नागरिक राहत असलेल्या ठिकाणांचा सी-फॉर्म दाखल न केल्यामुळे २६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी १३ जणांवर खटला सुरू आहे, ८ जण दोषी आढळले आहेत, ४ जणांची निर्दोष मुक्तता झाली असून २ प्रकरणांची चौकशी अद्याप सुरू आहे.

वर्षानिहाय वास्तव्यास असलेले पर्यटक

वर्ष : पर्यटक

२०२२ : ५८,८११

२०२३ : १,४८,०९५

२०२४ : २,७०,०३०

२०२५ : ३,०५,३५२

२०२६ : १,००,२५१ (आतापर्यंत)