
पणजी : मागील काही वर्षांत गोव्यात (Goa) चेक बाऊन्सची (Cheque bounce) प्रकरणे वाढत आहेत. राज्यात २०२१ ते २०२५ या कालावधीत चेक बाऊन्स झाल्या प्रकरणी २० हजार ५४३ खटले नोंदवण्यात आले आहेत. याचाच अर्थ महिन्याला सरासरी ३४३ तर दिवसाला सरासरी ११ खटले नोंद करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री (Chief Minister) डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती मिळाली आहे. याबाबत आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी प्रश्न उपस्थित केला होता. उत्तरातील माहितीनुसार, वरील कालावधीत एकूण खटल्यांपैकी उतर गोव्यामध्ये (North Goa) १४ हजार ५८० तर दक्षिणेत (South Goa) ५९६३ खटले नोंदवले गेले आहेत.
उत्तर गोव्यातील डिचोली, फोंडा, वाळपई येथील न्यायालयात अशा खटल्यांची संख्या अधिक आहे. तर दक्षिण गोव्यात मडगाव मधील न्यायालयात ‘चेक बाऊन्स’ची खटल्यांची संख्या तुलनेने अधिक आहे.
वर्ष निहाय पाहता २०२१ मध्ये उत्तर गोव्यातील न्यायालयात अशा एकूण २५३५ खटल्यांची नोंद झाली. २०२५ मध्ये ही संख्या किंचित कमी होऊन २२३५ झाली. दक्षिण गोव्यातील न्यायालयात २०२१ मध्ये या प्रकरणी १०१६ खटल्यांची नोंद झाली. तर २०२५ मध्ये ९८९ खटले नोंदवण्यात आले.
पाच वर्षांत अशा प्रकरणातील एकूण १०४० आरोपींना शोधून काढण्यात यश आलेले नाही. यामध्ये डिचोली, म्हापसा आणि फोंडा येथील न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यातील संशयित अधिक आहेत. याबाबत त्यांना समन्स, वॉरंट काढण्यात येत आहे. याशिवाय अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संशयितांना शोधण्याचे काम सुरू असल्याचे उत्तरात म्हटले आहे.