
वास्को : कोंसुआ येथे नारळ काढत असताना नारळाचे झाड अचानक मुळासकट उन्मळून पडल्याने २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत तरुणाचे नाव नवीन सोरेंग (२२, रा. बेनाली) असे असून तो मूळचा झारखंडचा रहिवासी होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंसुआ येथील एका खासगी जागेत नारळ काढण्यासाठी सोरेंग याला कामावर नेमण्यात आले होते. नारळ काढण्यासाठी तो झाडावर चढला असताना झाड अचानक वाकले आणि मुळासकट उन्मळून पडले. त्यामुळे तो खाली कोसळून गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुखापतींची तीव्रता लक्षात घेऊन त्याला पुढील उपचारासाठी बांबोळी येथील गोमेकाॅत हलवण्यात आले. तेथील अपघात विभागात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. वैद्यकीय-कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मृतदेह गोवा वैद्यकीय महाविद्यालयात जतन करून ठेवण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी वर्णा पोलिसांनी कलम १९४ अन्वये अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस निरीक्षक आनंद शिरोडकर यांच्या देखरेखीखाली आणि मुरगाव विभागाचे उपअधीक्षक गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कॅरी फर्नांडिस पुढील तपास करत आहेत.