पाच वर्षांत डोक्याला दुखापत होऊन ६५७ दुचाकीस्वारांचा मृत्यू

हेल्मेटचा वापर न केल्यामुळे २८२ जणांनी गमावला जीव

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16th March, 11:53 pm
पाच वर्षांत डोक्याला दुखापत होऊन ६५७ दुचाकीस्वारांचा मृत्यू

पणजी : राज्यात मागील पाच वर्षांत (२०२१ पासून ३१ जानेवारी २०२६ पर्यंत) डोक्याच्या दुखापतीमुळे ६५७ दुचाकी चालक किंवा मागे बसलेल्या प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी लेखी उत्तरात दिली आहे. यापैकी हेल्मेटचा वापर न केल्यामुळे २८२ जणांचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विरोधी पक्षनेते तथा कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी या संदर्भात अतारांकित लेखी प्रश्न विचारला होता. त्यानुसार, २०२१ पासून ३१ जानेवारी २०२६ पर्यंत राज्यात डोक्याच्या दुखापतीमुळे किती दुचाकी चालक किंवा मागे बसलेल्या व्यक्तींचा मृत्यू झाला, याची माहिती मागवण्यात आली होती.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानुसार, २०२१ मध्ये १०९, २०२२ मध्ये १२३, २०२३ मध्ये १४६, २०२४ मध्ये १३३, २०२५ मध्ये १३४, तर ३१ जानेवारी २०२६ पर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रमाणे एकूण ६५७ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण २८२ जणांचा मृत्यू हेल्मेट न परिधान केल्यामुळे झाल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. ही आकडेवारी लक्षात घेता दुचाकी चालवताना हेल्मेट वापरण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित होत असल्याचेही नमूद करण्यात आले.

हेल्मेट न वापरल्याने मृत्यू 
२०२१ : ५१
२०२२ : ४६
२०२३ : ५३
२०२४ : ६८
२०२५ : ६२
३१ जानेवारी २०२६ पर्यंत : २

डोक्याला दुखापत होऊन झालेले मृत्यू
२०२१ : १०९
२०२२ : १२३
२०२३ : १४६
२०२४ : १३३
२०२५ : १३४
३१ जानेवारी २०२६ पर्यंत : १२