‘माझे घर’अंतर्गत चार महिन्यांत दोन हजारांहून अधिक अर्ज

योजनेला उत्तम प्रतिसाद : १ लाखांहून अधिक अर्जांचे वाटप


14th March, 11:47 pm
‘माझे घर’अंतर्गत चार महिन्यांत दोन हजारांहून अधिक अर्ज

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : विविध प्रकारच्या जमिनीवरील बांधकामे नियमित करण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या ‘माझे घर’ योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत विविध प्रकारचे बांधकामे नियमित करण्यासाठी आतापर्यंत २,७२८ अर्ज आले आहेत. यातील काही अर्ज निकाली लावण्यात आले असून अन्य अर्जांची प्रक्रिया सुरू आहे. एकूण अर्जांपैकी सर्वाधिक १,१३६ अर्ज १९७२ पूर्वीच्या सर्व्हे प्लॅनवर नोंद असणारी घरे, बांधकामांच्या नियमितीकरणासाठी आले आहेत. आतापर्यंत योजनेच्या १ लाखांहून अधिक अर्जांचे वाटप झाले आहे.
१९७२ पूर्वीची सर्व्हे मॅपवरील घरे नियमित करण्यासाठी आलेल्या १,१३६ अर्जांपैकी सर्वाधिक ३१४ पेडणे तालुक्यातील आहेत. मुरगाव तालुक्यातून सर्वांत कमी १७ अर्ज आले आहेत. अवैध बांधकामे नियमित करून घेण्यासाठी ७४५ अर्ज आले. यातील सर्वाधिक १४९ सासष्टी तालुक्यातून आहेत. सत्तरीतून ९ अर्ज आले आहेत. २० कलमी कार्यक्रमाअंतर्गत देण्यात आलेल्या जागा नियमित करून क्लास १ ऑक्युपन्सी घेण्यासाठी ६६१ अर्ज आले आहेत. यामध्ये फोंडा तालुक्यातील सर्वाधिक १५३ अर्जांचा समावेश आहे.
सरकारी जमिनीवरील बांधकामे नियमित करण्यासाठी १४४ अर्ज आले. यामध्ये डिचोलीतील ५१,सत्तरीतील ३४, तर काणकोण, धारबांदोडा आणि केपे तालुक्यांतील प्रत्येकी एका अर्जाचा समावेश आहे. कोमुनिदाद जागेवरील घरे नियमित करण्यासाठी ४२ अर्ज आले. यामध्ये उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यातील प्रत्येकी २१ अर्जांचा समावेश आहे. याआधी या योजनेला विरोधी पक्षांनी विरोध केला होता. यामुळे चुकीचा प्रघात पडू शकतो असा आरोप त्यांनी केला होता. मात्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी योजनेमध्ये लाभ मिळणारे ९० टक्के गोमंतकीय असतील, असे स्पष्ट केले होते. सरकारने जागा नियमित करण्यासाठी नियम, अटी आणि शुल्क अधिसूचित करण्यात आले आहेत. विहित नमुन्यातील अर्जच स्वीकारले जात आहेत.
अर्ज करण्याची मुदत एका वर्षाने वाढवली
योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ एप्रिल २०२६ होती. मात्र कोमुनिदादकडून मंजुरी मिळवणे, रहिवासी दाखला मिळवणे आदींसाठी विलंब होत असल्याने अर्ज प्रलंबित राहण्याची संख्या वाढत आहे. याचा विचार करून सरकारने नुकतेच या योजनेचा कालावधी आणखी एका वर्षाने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अर्जांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
२० कलमीअंतर्गत ५ हजार लाभार्थी
२० कलमी कार्यक्रमांतर्गत ५,३९७ जणांना भूखंड देण्यात आले होते. यामध्ये बार्देश तालुक्यातील सर्वाधिक १,१७४ लाभार्थ्यांचा समावेश होता. मुरगावमध्ये सर्वात कमी २० भूखंड देण्यात आले होते.