स्थानिकांचा तीव्र विरोध : पुढील दोन महिने काम राहणार बंद

पणजी : स्थानिकांचा वाढता आणि तीव्र विरोध लक्षात घेऊन मिराबाग बंधाऱ्याचे काम तूर्तास थांबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पुढील दोन महिने या बंधाऱ्याचे काम बंद राहणार असून, त्यानंतर पावसाळा सुरू होणार असल्याने हे काम प्रदीर्घ काळ स्थगित राहील. या प्रकल्पाबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केल्यानंतरच घेतला जाईल, अशी माहिती जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.
जलस्रोत खात्याने या बंधाऱ्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून काम सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, स्थानिक ग्रामस्थांनी या जागेवर ठिय्या आंदोलन सुरू केले. प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, प्रकल्पाचे तांत्रिक सादरीकरणही केले, परंतु स्थानिकांचे समाधान झाले नाही. उलट, हा विरोध विधानसभा अधिवेशनापर्यंत पोहोचला.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी (६ मार्च) काही आंदोलकांनी विधानसभा गॅलरीत तक्ते दाखवून या प्रकल्पाचा निषेध केला होता. या घटनेमुळे सभागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आणि कामकाज तहकूब करावे लागले होते. या प्रकरणी कडक पावले उचलत सभापती गणेश गावकर यांनी हेमंत भंडारी, उमेश नाईक, उपेंद्र नाईक, आपा नाईक आणि रितिक मांद्रेकर या पाच जणांना पुढील आदेशापर्यंत विधानसभा संकुलात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.
या आंदोलकांना गॅलरी पास मिळवून दिल्याप्रकरणी आमदार विजय सरदेसाई यांनाही सभापतींनी सूचना दिली होती, त्यानंतर त्यांनी सभागृहाची माफी मागितली. सद्यस्थितीत स्थानिकांच्या भावनांचा विचार करून सरकारने नमती भूमिका घेतली असली, तरी पावसाळ्यानंतर या प्रकल्पाचे भवितव्य काय असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.