४ मे रोजी मतमोजणी : प्रशासकीय, राजकीय हालचाली गतिमान

पत्रकार परिषदेत पोटनिवडणुकीची घोषणा करताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या फोंडा मतदारसंघासाठी ९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा पूर्ण कार्यक्रम रविवारी जाहीर केला. एसआयआरनंतरच्या मतदार यादीवर होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. मागील निवडणुकीपेक्षा आता ४,२३० मतदार कमी झाले आहेत. त्यामुळे समीकरणे बदलली आहेत. कमी झालेले मतदार कुणासाठी फायद्याचे ठरतात यावर उमेदवाराचे यश ठरणार आहे.
डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये रवी नाईक कृषिमंत्री होते. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांचे निधन झाले. नियमानुसार जागा रिक्त झाल्यानंतर तेथे सहा महिन्यांत निवडणूक घेणे आवश्यक असते. त्यामुळे १५ एप्रिलपर्यंत फोंडा पोटनिवडणूक होणे गरजेचे होते. केंद्रीय निवडणूक आयोगाने अन्य पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसोबत फोंडा पोटनिवडणुकीची घोषणा केली. त्यामुळे मतदारसंघात राजकीय घडामोडींसह प्रचारालाही वेग येणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार फोंडा मतदारसंघासाठी ९ एप्रिल रोजी मतदान होणार असून ४ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होताच फोंडा मतदारसंघात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे प्रशासन आणि राजकीय पक्षांची निवडणुकीची तयारीही आता वेग घेणार आहे. दरम्यान, १६ मार्च रोजी अधिसूचना निघेल, तर २३ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया अधिसूचनेनंतर सुरू होणार आहे.
फोंडा हा गोव्यातील महत्त्वाचा आणि राजकीयदृष्ट्या प्रभावी मतदारसंघ मानला जातो. त्यामुळे या पोटनिवडणुकीकडे राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांचे लक्ष लागले असून निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फोंडा मतदारसंघावर रवी नाईक यांचेच वर्चस्व होते. १९९९ पासून फक्त २०१२ च्या निवडणुकीचा अपवाद वगळता तेच विजयी झाले आहेत.
४,२३० मतदार घटल्याने समीकरणे बदलणार
मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत एसआयआरनंतर फोंडा मतदारसंघातील मतदारांची संख्या ४,२३०ने कमी झाली आहे. त्यामुळे राजकीय समीकरणे पूर्णत: बदलणार आहेत. मतदारांची संख्या ४ हजारांहून अधिक प्रमाणात कमी झाल्याने राजकीय पक्षांनाही रणनीतीत बदल करावा लागणार आहे. मागील म्हणजेच २०२२च्या निवडणुकीत फोंडा मतदारसंघात ३२,१५७ मतदार होते. एसआयआरनंतर हा आकडा आता २७,९२७वर आला आहे. मतदारांची संख्या कमी झाल्याने त्याचा लाभ नेमका कोणाला होईल, हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पोटनिवडणुकीचे सविस्तर वेळापत्रक
अधिसूचना : सोमवार, १६ मार्च २०२६
उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत : सोमवार, २३ मार्च २०२६
उमेदवारी अर्जांची छाननी : मंगळवार, २४ मार्च २०२६
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत : गुरुवार, २६ मार्च २०२६
मतदान : गुरुवार, ९ एप्रिल २०२६
निकाल : सोमवार, ४ मे २०२६ 
स्व. रवी नाईक यांचे कार्य पुढे नेण्यासाठी फोंडा मतदारसंघात भाजपचाच उमेदवार विजयी होईल. ९ एप्रिल रोजी मतदान होणार असून लवकरच भाजपच्या उमेदवाराची घोषणा केली जाणार आहे.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री