सत्तरी शिगमोत्सवातील मारामारीप्रकरणी दोन रोमटामेळ पथकांवर प्रवेशबंदी

सरकारकडे कडक उपाययोजनांची मागणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th March, 11:53 pm
सत्तरी शिगमोत्सवातील मारामारीप्रकरणी दोन रोमटामेळ पथकांवर प्रवेशबंदी

वाळपई : १६ मार्च रोजी गोवा पर्यटन खाते, गोवा पर्यटन विकास महामंडळ आणि सत्तरी शिगमोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिगमोत्सवात आडपई व खांडेपार या दोन रोमटामेळ पथकांमध्ये झालेल्या मारामारीच्या पार्श्वभूमीवर, समितीने दोन्ही पथकांना सत्तरीतील शिगमोत्सवात प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुढील वर्षापासून रोमटामेळ, लोकनृत्य, वेशभूषा व चित्ररथ स्पर्धेतील कलाकारांची सरकारने मद्यचाचणी करावी, तसेच त्यांच्याकडून शांतता भंग न करण्याबाबत लेखी हमी घ्यावी, अशी मागणी सत्तरी शिगमोत्सव समितीने केली आहे. या संदर्भात बुधवारी संध्याकाळी आयोजित पत्रकार परिषदेत समितीने स्पष्ट केले की, या मागण्यांचे निवेदन लवकरच गोवा पर्यटन खात्याला सादर करण्यात येईल.

समितीचे सचिव उदय सावंत यांनी माहिती दिली की, आडपई येथील रोमटामेळ पथकाचे सादरीकरण पूर्ण झाले होते. त्यानंतर खांडेपार येथील पथकाचे सादरीकरण सुरू असतानाच दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण होऊन हाणामारी झाली. यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी दोन्ही गटांना कडक इशारा दिल्यानंतर हा वाद थांबला.

दोन्ही पथकांमध्ये पूर्ववैमनस्य

समितीचे कार्यक्रम प्रमुख मिलिंद गाडगीळ यांनी सांगितले की, दोन्ही गटांमध्ये जुने वैमनस्य असल्याचे समोर आले आहे. साखळी येथील शिगमोत्सवात एका तरुणाला मारहाण व धमकी देण्यात आली होती, याची माहिती वाळपई ठाण्यात देण्यात आली आहे. समितीचे उपाध्यक्ष विनोद शिंदे यांनी सांगितले की, वाळपई येथे घडलेली घटना सरकारने गांभीर्याने घ्यावी.

वाळपई येथे झालेल्या रोमटामेळ, चित्ररथ व इतर स्पर्धांसाठी सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच परीक्षकांची निवड करण्यात आली होती, असे समितीचे उपाध्यक्ष व जिल्हा पंचायत सदस्य नीलेश परवार यांनी सांगितले.

दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

परीक्षकांना स्पर्धेबाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते, परंतु काहींनी परीक्षकांना शिवीगाळ करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या संदर्भातील चित्रफीतही व्हायरल झाली असून संबंधितांची ओळख पटवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी समितीने पोलिसांकडे केली आहे.

हेही वाचा