इंडियन ऑईल अदानी गॅस लिमिटेडला धक्का

पणजी : काकोडा–कुडचडे परिसरातील शैक्षणिक संस्थांच्या जवळ परवानगीशिवाय उभारण्यात आलेला सीएनजी वितरण प्रकल्प ७ दिवसांच्या आत बंद करून जागा पूर्वस्थितीत आणण्याचे आदेश केपेचे उपजिल्हाधिकारी मनोहर कारेकर यांनी मे. इंडियन ऑईल अदानी गॅस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दिले आहेत. या मुदतीत कंपनीने प्रकल्प बंद करून जागा पूर्ववत केली नाही, तर केपे मामलेदार आवश्यक यंत्रणांच्या मदतीने संबंधित बांधकाम पाडून जागा मूळ स्थितीत आणतील आणि त्याचा खर्च अदानी गॅस लिमिटेडकडून वसूल केला जाईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
केपेचे उपजिल्हाधिकारी मनोहर कारेकर यांनी हा आदेश जारी केला आहे.
हा आदेश भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत जारी करण्यात आला आहे. काकोडा कुडचडे येथील चेतना शैक्षणिक सोसायटीने केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. संबंधित ठिकाणी सर्व्हे क्रमांक ९८/६ मध्ये परवानगीशिवाय बांधकाम सुरू असल्याचे तसेच सीएनजी सिलिंडरचा साठा करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले होते.
तक्रारीनंतर केपे मामलेदारांनी कुडचडे काकोडा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह पाहणी केली. पाहणीत १५० किलो क्षमतेचे २० सीएनजी सिलिंडर पाइपलाइनद्वारे जोडलेले असल्याचे आढळले. तसेच सीएनजी साठवणुकीची यंत्रणाही उभारलेली होती. मात्र, ठिकाणी कोणतीही अधिकृत परवानगी दर्शविणारा फलक नव्हता.
नगरपालिकेकडून बांधकाम परवाना घेतलेला नसल्याचेही स्पष्ट झाले. तसेच सीएनजी साठवणूक व वितरणासाठी आवश्यक जमीन रूपांतरण परवानगी आणि वीज विभागाची एनओसी देखील घेतलेली नव्हती.
या सर्व बाबींचा विचार करून उपजिल्हाधिकाऱ्यांनी कंपनी आणि जागेच्या मालकाला नोटीस देऊन सुनावणी घेतली. परवानग्यांचा अभाव आणि सुरक्षेतील त्रुटी लक्षात घेऊन अखेर प्रकल्प बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शैक्षणिक संस्थांजवळ सीएनजी प्रकल्प सुरू ठेवणे धोकादायक
हा प्रकल्प आयटीआयपासून अवघ्या ७५ मीटर अंतरावर आणि चेतना चॅरिटेबल ट्रस्टच्या शाळेपासून सुमारे २५० मीटर अंतरावर आहे. अशा परिस्थितीत आवश्यक परवानग्या आणि सुरक्षेच्या उपाययोजना नसताना शैक्षणिक संस्थांच्या जवळ सीएनजी प्रकल्प सुरू ठेवणे धोकादायक ठरू शकते, असे प्रशासनाने नमूद केले आहे.