हणजूण, साळगाव पोलिसांकडून दोन्ही कार चालकांना अटक, सुटका

म्हापसा : साळगाव व शिवोली येथे कारने धडक दिल्याने झालेल्या दोन अपघातात मार्गारेट रॉड्रिग्ज (८५, रा. साळगाव) आणि डॉ. प्रल्हाद कुमार रैतानी (७५, रा. फर्नांडिसवाडा शिवोली व मूळ उत्तरप्रदेश) या जखमी पादचार्यांचा मृत्यू झाला. या अपघाताला कारणीभूत दोन्ही कार चालकांना साळगाव व हणजूण पोलिसांनी अटक केली. नंतर त्यांची जामिनावर सुटका केली.
शुक्रवार दि. १३ रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हे दोन वेगवेगळे अपघातात घडले. साळगाव येथील चर्चजवळ पादचारी मार्गारेट रॉड्रिग्ज हिला जीए ०३ डब्ल्यू ५८९२ क्रमांकाच्या स्वीप्ट डिझायर कारची धडक बसली व ती गंभीर जखमी झाली. तिला रुग्णवाहिकेतून म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यानंतर उपचारादरम्यान तिचे सकाळी ११.३० च्या सुमारास निधन झाले.
कारचालक वसंत शिरोडकर (५६) हे गाडी घेऊन साळगावहून नागवाच्या दिशेने जाताना हा अपघात घडला. रस्त्यावर दाट धुके असल्यामुळे रस्त्यावरून चालणारी पादचारी महिला त्यांच्या नजरेस पडली नाही. अपघातानंतर कारचालक साळगाव पोलिसांना शरण आला. त्यानेच पोलिसांना अपघाताची माहिती दिली. पोलीस हवालदार प्रणेश गावस यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. नंतर त्याची जामिनावर सुटका केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षय फातर्पेकर हे करीत आहेत.
तर, शिवोली येथील अपघात एसबीआय बँक शाखेजवळ घडला. डॉ. प्रल्हाद कुमार रैतानी हे मॉर्निंग वॉकला जात होते. त्यावेळी शिवोलीहून चोपडेच्या दिशेने जाणार्या जीए ११ ए ६८८५ क्रमांकाच्या स्वीफ्ट कारने पादचार्याला मागून धडक दिली. अपघातात ते जंभीर जखमी झाले. त्यांना प्रथम शिवोली आरोग्य केंद्रात व नंतर म्हापसा जिल्हा इस्पितळात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तिथून त्यानंतर गोमेकॉत पाठवण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी ७ च्या सुमारास त्यांचे निधन झाले.
पोलीस हवालदार हरीशकुमार सावंत यांच्या तक्रारीच्या आधारे हणजूण पोलिसांनी या अपघातास कारणीभूत कार चालक वाय. एम. आलमधन (४३, रा. मोरजी व मूळ दक्षिण दिल्ली) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. नंतर जामिनावर त्याची सुटका करण्यात आली.
सेवानिवृत्त डॉक्टराचा मृत्यू
डॉ. प्रल्हाद कुमार रैतानी हे सेवानिवृत्त डॉक्टर असून शिवोली येथे वास्तव्यास असलेल्या आपल्या मुलीकडे ते काही दिवसांपूर्वी आले होते. अपघातात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साहील वारंग हे करीत आहेत.