बाणावलीत पुन्हा ‘धिरयो’चे आयोजन, व्हिडिओ व्हायरल झाल्याने प्रकार उघड

जिल्हा समितीसह कोलवा पोलिसांच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
33 mins ago
बाणावलीत पुन्हा ‘धिरयो’चे आयोजन, व्हिडिओ व्हायरल झाल्याने प्रकार उघड

मडगाव : बाणावलीतील खुल्या जागांमध्ये नियमितपणे बैलांच्या झुंजींचे आयोजन केले जात आहे. मात्र, पोलिसांकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. बाणावलीतील धिरयोचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा समिती व पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे गैरप्रकार होत असल्याची चर्चा आहे.

राज्यात धिरयो आयोजनावर बंदी आहे. दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांकडून धिरयो रोखण्यासाठी समितीची स्थापनाही करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही सासष्टीच्या विविध भागात धिरयोंचे आयोजन होताना दिसत आहे. बाणावली मारिया हॉलच्या मागील बाजूला असलेल्या खुल्या जागेत, सुरावली, कुडतरीतील मोकळ्या मैदानांमध्ये झुंजी आयोजित केल्या जातात. अलीकडेच सुरावली येथे रॉलेक्स आणि पाकलो या दोन रेड्यांमध्ये झुंज झाली होती. ती पाहण्यासाठी शेकडो लोकांची गर्दी झाली होती. हा सर्व प्रकार बेकायदेशीर बेटींगसाठी होताना दिसतो. आता पुन्हा एकदा बाणावलीतील खुल्या जागेत दोन बैलांच्या झुंजींचे आयोजन करण्यात आल्याचा १४ मार्च रोजीचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. याठिकाणी बैलांच्या झुंजी पाहण्यासाठी लोकांची गर्दीही दिसून येते. धिरयोमुळे सार्वजनिक सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये माजोर्डा येथील झुंजीवेळी ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता, तर जानेवारी २०२४ मध्येही बाणावलीत एकाला रेड्याने शिंग घुसवल्याने त्याला प्राण गमवावे लागले होते. काहीवेळा पोलिसांना या धिरयोची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पोहोचण्यापूर्वीच आयोजक धिरयो बंद करुन घटनास्थळावरुन जातात. त्यामुळे आयोजकांना कुणाकडून कारवाईची माहिती मिळते हे शोधून काढण्याची गरज आहे. जिल्हा प्रशासनाची कारवाई ही केवळ फार्सच असल्याचे स्थानिकांचे मत आहे.

यापूर्वीही बाणावलीतील झुंजींचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर केवळ अज्ञातांविरोधात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. पण ठोस कारवाई पोलिसांकडून होत नाही. प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार धिरयो आयोजनावर कडक कारवाई करण्याची मागणी सध्या होत आहे. तसेच दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांकडून धिरयो आयोजनाची गंभीर दखल घेण्याची गरज आहे.