निकाल ४ मे रोजी

नवी दिल्ली: देशाच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज संध्याकाळी ४ वाजता दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या राज्यांमधील मतदानाचे टप्पे आणि तारखांची अधिकृत घोषणा केली. या चार राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशाच्या विधानसभांचा कार्यकाळ मे महिन्यात संपत असल्याने, त्यापूर्वीच नवी सरकारे अस्तित्वात येणे आवश्यक आहे. या घोषणेसोबतच संबंधित राज्यांमध्ये पासूनच आदर्श आचारसंहिता लागू होईल.
निवडणुकीचे टप्पे आणि कार्यक्रम
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक दोन टप्प्यांत पार पडेल. तेथे २४ एप्रिल तसेच २९ एप्रिल या तारखांना मतदान पार पडेल तर ४ मेला मतमोजणी असेल. आसामध्ये ९ एप्रिलला मतदान असेल तर ४ मे रोजी मतमोजणी पार पडेल. केरळमधील मतदान ९ रोजी तर मतमोजणी ४ मे रोजी असेल. पुद्दुचेरीत ९ एप्रिल रोजी मतदान तर ९मे रोजी मतमोजणी पार पडेल. तमिळनाडूत यंदा एकाच टप्प्यात मतदान आहे. येथे २३ एप्रिल रोजी मतदान तर ४ मे रोजी मतमोजणी असेल.
तामिळनाडूत मतदारांची मोठी घट
यंदा मतदार याद्या एसआयआर प्रक्रियेतून तावून-सुलाखून निघाल्या असून, त्याचे धक्कादायक आकडे समोर आले आहेत. ज्या पाच राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत, त्यापैकी तामिळनाडूमधून सर्वाधिक मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी जेव्हा ही प्रक्रिया सुरू झाली, तेव्हा राज्यात ६ कोटी ४१ लाखांहून अधिक मतदार होते. मात्र, चार महिने चाललेल्या या विशेष मोहिमेत तब्बल ७४ लाख ७ हजार २०७ मतदारांची नावे यादीतून बाद करण्यात आली आहेत. राज्यात आता ५ कोटी ६७ लाख ७ हजार ३८० नोंदणीकृत मतदार आहेत. यापाठोपाठ पश्चिम बंगालमध्ये सुमारे ५८ लाख लोकांची नावे वगळण्यात आली आहेत. केरळमध्ये ८ लाख, आसाममध्ये २ लाख आणि पुद्दुचेरीमध्ये सर्वात कमी ७७ हजार नावे वगळली गेली आहेत.
राजकीय आव्हानांचा विचार करता, पश्चिम बंगालमध्ये सलग १४ वर्षांपासून सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसमोर भाजपने मोठे आव्हान उभे केले आहे. जर ममता बॅनर्जी पुन्हा जिंकल्या, तर सलग चौथ्यांदा मुख्यमंत्री बनणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला ठरतील. तामिळनाडूमध्ये गेल्या ६० वर्षांपासून भाजप किंवा काँग्रेसला स्वतःच्या बळावर सत्ता मिळवता आलेली नाही. मात्र, यावेळी द्रमुक, भाजप-अण्णाद्रमुक युती आणि चित्रपटसृष्टीला रामराम करून राजकारणात उतरलेले 'थलपती' विजय यांची टीव्हीके पार्टी रिंगणात असल्याने तिथे तिरंगी लढत पाहायला मिळू शकते.
केरळमध्ये दर पाच वर्षांनी सत्ता बदलण्याची परंपरा असली तरी, २०२१ मध्ये डाव्या आघाडीने ती मोडीत काढली होती. आता काँग्रेस ही परंपरा पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. येथे डावे आणि काँग्रेसला भाजपचे कडवे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. आसाममध्ये भाजपने १२६ पैकी १०० हून अधिक जागांचे लक्ष्य ठेवले असून, तिथे बांगलादेशी घुसखोर आणि सीमा सुरक्षा हे मुद्दे केंद्रस्थानी आहेत. पुद्दुचेरीमध्ये काँग्रेस आपले सरकार कोसळल्याचा मुद्दा उपस्थित करून पुन्हा सत्तेत येण्यासाठी धडपडत आहे. आजच्या घोषणेनंतर या चार राज्यांतील तसेच एका केंद्रशासित प्रदेशातील राजकीय संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे.