इराकमध्ये अमेरिकेचे लष्करी विमान कोसळले

तेहरान : मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती अधिकच गंभीर बनत आहे. इस्त्रायल-अमेरिकेने (Israel-USA) तेहरानवर जबरदस्त हल्ले सुरूच ठेवले आहेत. विविध देशांतून धक्कादायक घडामोडी समोर येत आहेत. इराण (Iran)-अमेरिका-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दुबईत (Dubai) स्फोटांचे आवाज ऐकू आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. इराकमध्ये अमेरिकेचे लष्करी विमान कोसळल्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले.
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (Central command of USA) दिलेल्या माहितीनुसार, इराकच्या हवाई क्षेत्रात अमेरिकेचे केसी-१३५ (KC-135) इंधनपुरवठा करणारे लष्करी विमान कोसळले. या विमानात किमान पाच कर्मचारी होते. या दुर्घटनेत दुसरे एक विमान सुरक्षितपणे उतरवण्यात यश आले. या घटनेमागे शत्रू किंवा मैत्रीपूर्ण गोळीबार कारणीभूत नसल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. दुर्घटनेनंतर बचावकार्य सुरू आहे.
दुबईत स्फोटांमुळे धडकी
दुबईतील आर्थिक केंद्र परिसरात अचानक स्फोटांचे आवाज ऐकू आले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार औद्योगिक क्षेत्रात लागलेल्या आगीमुळे धुराचे लोट आकाशात पसरल्याचे दिसून आले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
इस्त्रायल-अमेरिकेचे तेहरानवर हवाई हल्ले
अमेरिका-इस्रायल इराणवरील हल्ल्यांची तीव्रता वाढत आहे. इराणची राजधानी तेहरानवर मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले करण्यात आले. इस्रायलच्या लष्कराने तेहरानवर “विस्तृत आणि तीव्र हल्ले” सुरू केल्याची घोषणा केली आहे.
तुर्कस्तानातील अदाना जवळ असलेल्या नाटोच्या महत्त्वाच्या हवाई तळावर सायरन वाजल्याचे माहिती आहे. या तळावर अमेरिकेचे सैन्य तैनात आहे.
फ्रेंच सैनिक ठार
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमेन्युएल मॅक्रोन (Emmanuel Macron) यांनी इराकमधील एरबिल येथे ड्रोन हल्ल्यात एक फ्रेंच सैनिक ठार झाल्याची माहिती दिली. या युद्धातील फ्रान्सचा हा पहिला लष्करी बळी मानला जात आहे. काही सैनिक जखमी झाल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, इराण समर्थक ‘अशाब अलकहफ’ या गटाने फ्रेंच विमानवाहू जहाज प्रदेशात दाखल झाल्यानंतर इराकमधील आणि परिसरातील फ्रेंच हितसंबंधांवर हल्ल्याचा इशारा दिला आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांनीही इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याला इशारा देत कठोर भूमिका घेतली आहे.
या सर्व घडामोडींमुळे मध्यपूर्वेतील संघर्ष अधिकच चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.