
नवी दिल्ली : अमेरिकेने इराणचे नवे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई ( Mojtaba Khamenei) आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सशी (IRGC) संबंधित काही वरिष्ठ अधिकाऱ्यांविषयी माहिती देणाऱ्यास तब्बल १० दशलक्ष डॉलर्स (सुमारे ९२ कोटी ४७ लाख रुपये) इतके बक्षीस जाहीर केले आहे. ही घोषणा अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या न्यायासाठी बक्षीस (Rewards for Justice) कार्यक्रमांतर्गत करण्यात आली.
अमेरिकेच्या निवेदनानुसार, संबंधित व्यक्ती इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या विविध घटकांचे नेतृत्व करतात आणि जगभरात दहशतवादी कारवायांचे नियोजन, संघटन व अंमलबजावणी करतात. या व्यक्तींविषयी माहिती देणाऱ्यांना बक्षीस तसेच आवश्यक असल्यास सुरक्षित पुनर्वसनाची संधी देण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या यादीत मोज्तबा खामेनेई (Mojtaba Khamenei) यांच्यासह सर्वोच्च नेत्यांच्या कार्यालयाचे उपप्रमुख अली असघर हेजाझी (Ali Asghar Hejazi) आणि इराणचे सुरक्षा प्रमुख अली लरीजानी ( Ali Larijani) यांची नावे समाविष्ट आहेत.
इराणवरील हल्ले तीव्र करणार : डोनाल्ड ट्रम्प
दरम्यान, अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात सुरू केलेल्या हवाई कारवायांचा तिसरा आठवडा सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी येत्या काही दिवसांत इराणवरील हल्ले आणखी तीव्र केले जातील, असे संकेत दिले आहेत. फॉक्स न्यूज रेडिओला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी “आम्ही पुढील आठवड्यात अत्यंत कठोर हल्ले करणार आहोत,” असे म्हटले आहे.
अमेरिकेचे संरक्षण सचिव पेटे हेगसेठ (Pete Hegseth) यांच्या मते, मोहिमेच्या सुरूवातीपासून अमेरिका आणि इस्रायलच्या हवाई दलाने आतापर्यंत १५ हजारांहून अधिक लक्ष्यांवर हल्ले केले आहेत. त्यामुळे इराणची प्रत्युत्तर देण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात कमी झाली असल्याचा दावा त्यांनी केला.
ऊर्जा बाजारात अस्थिरता
या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजारातही मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने महत्त्वाच्या होर्मुझ समुद्रधुनी (Strait of Hormuz ) मार्गावर दबाव निर्माण केल्याने तेल पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. या मार्गातून जगातील सुमारे पाचव्या भागाइतका तेल पुरवठा होतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर १०० डॉलर्स प्रति बॅरलच्या पुढे गेले असून शेअर बाजारातही चढ-उतार दिसून येत आहेत.
संघर्ष अधिक तीव्र करणार : इराण
इराणने आपल्या देशावर हल्ले सुरू राहिल्यास संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.