युद्ध सुरू करणाऱ्या ख्रिश्चन नेत्यांनी पापाचा कबुलीजबाब द्यावा : पोप लिओ

इराण युद्धावरून पोप लिओ यांची अप्रत्यक्ष टीका

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
39 mins ago
युद्ध सुरू करणाऱ्या ख्रिश्चन नेत्यांनी पापाचा कबुलीजबाब द्यावा : पोप लिओ

व्हॅटिकन / वॉशिंग्टन : इराणवरील (Iran) अमेरिका-इस्रायली (USA-Israel) हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पोप लिओ (Pope Leo)   यांनी अप्रत्यक्षपणे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump) यांच्यावर टीका केली आहे. युद्धाला (War) जबाबदार असलेल्या ख्रिश्चन राजकीय नेत्यांनी आत्मपरीक्षण करून ‘कन्फेशन’ म्हणजेच आपल्या पापाचा कबुलीजबाब देण्याचे  धैर्य दाखवावे, असे त्यांनी म्हटले आहे.

व्हॅटिकनमध्ये पाद्रींसाठी आयोजित परिषदेत बोलताना पोप म्हणाले, “सशस्त्र संघर्षात गंभीर जबाबदारी असलेल्या ख्रिश्चन नेत्यांमध्ये आपल्या कृतींचे प्रामाणिक आत्मपरीक्षण करण्याचे आणि कबुलीजबाब देण्याची नम्रता व धैर्य आहे का?”

पोप लिओ यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी अलीकडील काळात ते इराणमधील सुरू असलेल्या युद्धावर सातत्याने चिंता व्यक्त करत आहेत. २८ फेब्रुवारीपासून अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त हवाई हल्ले सुरू केल्यानंतर मध्यपूर्वेत तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

दरम्यान, वॉशिंग्टनचे कार्डिनल रॉबर्ट मॅकइलरॉय ( Robert McElroy) यांनीही या आठवड्याच्या सुरूवातीला अमेरिका-इस्रायली हल्ल्यांवर तीव्र टीका केली होती. चर्चच्या “न्याय्य युद्ध” निकषांनुसार हे हल्ले नैतिकदृष्ट्या योग्य ठरत नसल्याचे त्यांनी म्हटले. 

कॅथोलिक चर्चचे मत साधारणपणे युद्धविरोधी आहे. येशू ख्रिस्तांनी अहिंसेचा संदेश दिला असल्याचे सांगत चर्च अनेकदा संघर्ष टाळण्याचे आवाहन करत असते.

पोप लिओ यांनी कबुलीजबाबाच्या परंपरेबद्दल बोलताना सांगितले की, हा धार्मिक विधी व्यक्तीला आपल्या चुका मान्य करून देवाकडून क्षमा मागण्यास मदत करतो आणि समाजात शांतता व ऐक्य वाढवण्यास हातभार लावतो.

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षात आतापर्यंत मध्यपूर्वेत सुमारे दोन हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या लष्करी तळांना आश्रय देणारे काही गल्फ देश तसेच लेबनॉनही या संघर्षाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

युद्ध कधी संपेल याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी मिश्र संकेत दिले आहेत. एका बाजूला युद्ध जवळपास संपल्याचे त्यांनी म्हटले, तर दुसरीकडे इराणवरील हल्ले पुन्हा तीव्र करण्यात आले. या संघर्षात आतापर्यंत १३ अमेरिकेच्या सैनिकांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी सहा सैनिकांचा इराकमध्ये विमान दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.


हेही वाचा