मृत्यू पावल्याची माहिती चुकीची

तेहरान : इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांच्या पत्नी मन्सुरेह खोजास्ते ( Mansoureh Khojasteh) यांच्या मृत्यूच्या बातम्या चुकीच्या असल्याचे इराणच्या सरकारी माध्यमांनी स्पष्ट केले आहे. त्या जीवंत असून त्यांच्या मृत्यूबाबत पसरलेल्या बातम्यांना कोणताही आधार नसल्याचे सांगण्यात आले.
युद्धाच्या सुरूवातीला अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात अली खामेनेई यांच्या पत्नी मन्सुरेह खोजास्ते यांचाही मृत्यू झाल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. मात्र या बातम्या पूर्णपणे चुकीच्या असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. इराणच्या प्रसिद्धी माध्यमांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे.
दरम्यान, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई ( Mojtaba Khamenei) यांनी गुरुवारी दिलेल्या आपल्या पहिल्या निवेदनात आईच्या मृत्यूचा कोणताही उल्लेख केला नव्हता. त्यानंतर या अफवांवर इराणी माध्यमांनी स्पष्टीकरण दिले.
युद्धाच्या सुरूवातीला अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त होते. त्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या हल्ल्यात त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य सूना, जावई, मुलगी आणि नातवंडे मृत झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.
मन्सुरेह खोजास्ते या सार्वजनिक जीवनापासून दूर राहणाऱ्या व्यक्ती म्हणून ओळखल्या जातात. इराणच्या सत्ताधारी कुटुंबातील त्या अत्यंत खाजगी जीवन जगणाऱ्या सदस्यांपैकी एक मानल्या जातात.
बदला घेण्याची मोज्तबा यांची शपथ
नवे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई यांनी आपल्या पहिल्या सार्वजनिक संदेशात युद्धात मृत्यू पावलेल्या इराणी नागरिकांचा बदला घेण्याची शपथ घेतली. त्यांनी अमेरिका-इस्रायलविरोधातील संघर्षात इराणची भूमिका स्पष्ट करताना होर्मुझ (Strait of Hormuz) समुद्रधूनी बंद ठेवण्याचा मुद्दा शत्रूवर दबाव टाकण्यासाठी वापरला जाऊ शकतो, असेही सूचित केले.
जागतिक ऊर्जा संकट तीव्र
दरम्यान, युद्धामुळे जागतिक ऊर्जा संकट तीव्र होत असताना इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाघेई यांनी सांगितले की, काही जहाजांना होर्मुझ समुद्रधूनी मार्गे जाण्याची परवानगी दिली जाऊ शकते, मात्र त्यासाठी इराणी नौदलाशी समन्वय आवश्यक राहील.