इंधन टंचाईवर साई संस्थानचा उतारा; दररोज ४० हजार भाविकांचा स्वयंपाक सौर ऊर्जेवर

सौर ऊर्जेने रोज शिजतेय १० क्विंटल डाळ-भाजी; केंद्रानेही घेतली नोंद. 'युनिक मॉडेल' म्हणून सन्मानित केले.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
29 mins ago
इंधन टंचाईवर साई संस्थानचा उतारा; दररोज ४० हजार भाविकांचा स्वयंपाक सौर ऊर्जेवर

शिर्डी: जगभरात इंधन दरवाढ आणि टंचाईचे संकट गडद होत असताना, शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान ट्रस्टने सौर ऊर्जेचा वापर करून एक नवा आदर्श देशासमोर ठेवला आहे. सौर ऊर्जेवर आधारित महाप्रचंड कुकिंग सिस्टमद्वारे दररोज तब्बल ४० हजार भाविकांसाठी अन्न शिजवले जात आहे. या अभिनव प्रयोगामुळे दररोज २०० किलो गॅसची मोठी बचत होत असून, केंद्र सरकारने याला देशातील एक 'युनिक मॉडेल' म्हणून सन्मानित केले आहे.


Shirdi Prasadalaya for devotees of Sai Baba


शिर्डीत दर्शनासाठी येणाऱ्या ७५ ते ८० हजार भाविकांपैकी सुमारे ४० हजार भाविक दररोज साईप्रसादालयात भोजनाचा लाभ घेतात. पूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात भोजन तयार करण्यासाठी दररोज सुमारे १७०० किलो गॅस खर्च होत असे, ज्यामुळे संस्थानवर मोठा आर्थिक भार पडत होता. ही बाब लक्षात घेऊन संस्थानने २००९ मध्ये सौर कुकिंग प्रणाली उभारण्याचा निर्णय घेतला. सुमारे १ कोटी ३७ लाख रुपये खर्च करून उभारलेल्या या प्रकल्पात ७३ सौर डिश लावण्यात आल्या आहेत. या प्रणालीच्या माध्यमातून एकाच वेळी १५ क्विंटल तांदूळ, ५ क्विंटल डाळ आणि ५ क्विंटल भाजी शिजवली जाते.


Shree Saibaba Sansthan Trust, Shirdi.Official Website


या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे २००९ ते २०२६ या काळात दोन लाख किलोपेक्षा जास्त गॅसची बचत झाली असून, संस्थानचे सुमारे दोन कोटी रुपये वाचले आहेत. केवळ स्वयंपाकच नव्हे, तर भाविकांच्या निवासाच्या ठिकाणी गरम पाण्यासाठीही सौर ऊर्जेचा वापर केला जात आहे. यामुळे १० हजार भाविकांना २४ तास मोफत गरम पाण्याची सुविधा मिळत आहे. पर्यावरण संवर्धन आणि ऊर्जा बचतीच्या या मॉडेलची दखल आता राष्ट्रीय स्तरावर घेतली जात असून, भविष्यातील ऊर्जा संकटावर हा एक उत्तम उपाय असल्याचे सिद्ध झाले आहे.

गॅस टंचाईचा फटका 'डाळ-भात' मेनूमधून बाद

देशातील गॅस टंचाईमुळे शिर्डी साई संस्थानने प्रसादालयाच्या काल  शनिवार १४ मार्चपासून मेनूमध्ये कपात केली आहे. इंधन बचतीसाठी आता भक्तांना डाळ-भाताऐवजी केवळ एक भाजी, चपाती आणि खिचडी दिली जाणार आहे. 


हेही वाचा